पुणे – चिंचवड येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल प्रशालेच्या (जीआयआयएस) मुलींच्या फुटबॉल संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना सीबीएसईच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. ही स्पर्धा नोयडा येथे जेबीएम ग्लोबल स्कूलच्या मैदानावर 9 नोव्हेंबरपासून पार पडणार आहे.
सीबीएसईच्या दक्षिण विभागा 2 च्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून ग्लोबल इंटरनॅशनल प्रशालेच्या मुलींच्या संघाने 17 वर्षांखालील गटात ही कामगिरी केली. “जीआयआयएस’ प्रशालेला अंतिम सामन्यात मुंबईच्या रायन इंटरनॅशनल प्रशाला संघाकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
शहरातून 2019-20च्या मोसमासाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणारी “जीआयआयएस’ ही एकमेव प्रशाला ठरली आहे. “सीबीएसई’च्या नियमानुसार प्रत्येक विभागातील अव्वल दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतात.
बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत “जीआयआयएस’ प्रशाला संघाने प्रथमच विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. यामध्ये “सीबीएसई’च्या बंगळूर, पुणे आणि तिरुवनंतपुरम येथील 32 शाळांचा सहभाग होता. पहिल्या फेरीत त्यांना “बाय’ मिळाला होता.
“जीआयआयएस’च्या संघात इयत्ता सातवी ते 11वी पर्यंतच्या खेळाडूंचा समावेश होता. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात त्यांनी पीएसबीबी लर्निंग लीडरशीप ऍकॅडमी, बंगळूर (3-2, पेनल्टीशूट आऊट), एसईएस गुरुकुल स्कूल, पुणे (3-2, पेनल्टी शूटआऊट), स्कूल ऑफ स्कॉलर्स, वर्धा नागपूर (3-0) या शाळांचा पराभव केला. या प्रवासात त्यांनी यावर्षी पुणे विभागाच्या जिल्हा परिषदेच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या एसईएस गुरुकूल आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या स्पर्धेतील विजेत्या स्कूल ऑफ स्कॉलर्स या अव्वल संघांचा पराभव केला. “जीआयआयएस’ प्रशाला संघाने पिंपरी-चिंचवड विभागातून जिल्हा परिषदेच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता.
—————-
निकाल –
अंतिम सामना – पराभूत वि. रायन इंटरनॅशनल, मुंबई (0-3)
उपांत्य फेरी – वि.वि. स्कॉलर्स, वर्धा-नागपूर (3-0 (एंजेला गुट्टल 2, अनुष्का गंगवार)
उपांत्यपूर्व फेरी – वि.वि. एसईएस गुरुकूल स्कूल, पुणे 3-2 शूट-आऊट (विधी झाला, संजय कामत, अर्चिशा गायकवाड)
उप-उपांत्यपूर्व फेरी – वि.वि. पीएसबीबी लर्निंग लिडरशीप ऍकॅडमी 3-2 शूट-आऊट (समीरा शाह, नेहा भागवत, संजना कामत)
पहिली फेरी ः “बाय’
———
संघ – समीरा शाह (कर्णधार)स आर्चिसा गायकवाड, युकिता कालबाग, नेहा भागवत, तनिशा वैद्य, शिवानी रिषीराज, स्वरदा सावंत (गोलरक्षक), अहना रामन, नियती अगरवाल, विधी झाला, एंजेला गुट्टल, निधी, अगरवाल, तिया बिनोद, संजना कामत, रिहाना स्टिफन, अस्मी पाठक, रितीका मलगट्टी, अनुष्ता गंगवार, व्यवस्थापक – ट्रेसी फेरेरा-ऍग्नर, प्रशिक्षक – निखिल नायर, रणजीत जोशी
———-
मुलींनी संधीचे सोने केले – डॉ. व्होरा
आमच्या मुलींनी दोन वर्षापासूनच हा “ब्युटिफुल खेळ’ खेळायला सुरवात केली. अगदी शून्यातून हा संघ उभारण्यात आला. ज्या मुलींना किक मारता येते आणि चेंडू पकडता येतो अशा मुलींना घेऊन त्यांना घडविण्यात आले. शाळेच्या प्रिन्सिपल डॉ. अमृता व्होरा यांच्या नेतृत्त्वाखालील व्यवस्थापन समितीने या मुलींना सुरवातीपासून प्रोत्साहित केले. त्यामुळेच त्यांना हे यश मिळाले.
व्होरा म्हणाल्या, “”या मुलींमध्ये गुणवत्ता दडली होती. त्यांना ती दाखविण्याची संधी आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक होते. या दोन गोष्टी मिळाल्यावर मुली काय करु शकतील हे आम्ही जाणून होतो. मुलींनी मिळालेल्या संधीचे सोने केले आणि घेतलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. हा संघ घडविण्यामागे ज्या ज्या कोणाचे सहकार्य होते अशा सर्वांचेही मी कौतुक करते. यामुळे ट्रेसी परेरा, प्रशिक्षक निखिल नायर या दोघांनी सुरुवातीपासून या संघाला घडविण्यासाठी कष्ट घेतले. या संघाचे ते एकप्रकारे कणाच बूनन राहिले होते. यावर्षी त्यांना प्रशिक्षक रणजीत जोशी यांची साथ मिळाली.”
————-
पन्नास विद्यार्थिनी
सध्या “जीआयआयएस’ प्रशालेत फुटबॉलमध्ये 50 मुली खेळत आहेत. या मुलींना सर्व सुविधा प्रशालेमार्फत मोफत पुरविली जाते. पाचव्या इयत्तेपासून ते अकरावी पर्यंतच्या मुलींचा यात समावेश असून, त्या विविध स्पर्धेत 14 आणि 17 वर्षांखालील गटात शाळेचे प्रतिनिधीत्व करतात.
————–
लक्षणीय कामगिरी
तिसरा क्रमांक – 17 वर्षांखालील – सुब्रतो मुखर्जी (पिंपरी-चिंचवड विभाग) पुणे 2018
उपविजेतेपद – 17 वर्षांखालील – फाईव्ह अ साईड बीकॉन करंडक, चिंचवड, 2018
-तिसरा क्रमांक – 17 वर्षांखालील जिल्हा परिषद स्पर्दा (पिंपरी चिंचवड विभाग) पुणे, 2019
उपविजेतेपद – 17 वर्षांखालील – सीबीएसई दक्षिण विभाग 2 फुटबॉल, बंगळूर, 2019.