पुणे दि२४ : -कोथरूडकर जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानून कोथरूडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजयानंतर आज श्री पाटील यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले, यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, माजी. आमदार मेधाताई कुलकर्णी, चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शिवसेना-भाजप महायुतीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, कोथरूडच्या सुज्ञ नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचा शतश: आभारी आहे. या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या विकासाचा जो शब्द इथल्या जनतेला दिला होता, तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याच बरोबर राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने जो जनादेश दिला आहे, त्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
यावेळी कोथरूड विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विजयानंतर श्री. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी कर्वे यांना वंदन केले. तर कोथरूडचे ग्रामदैवत श्री. म्हातोबाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.