मुंबई, दि. १४ :- राहुल गांधी आणि स्त्रियांबद्दल सोशल मीडियातून अपमानास्पद टिपणी करणारे मुंबई विद्यापीठ अकॅडमी ऑफ थिअटर आर्ट (एमटीए) चे संचालक योगेश सोमण यांना अखेर सक्तीच्या रजेवर जावं लागलं आहे. सोमण यांच्यामुळे परेशान असलेले विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलनाला बसले होते. अकॅडमी ऑफ थिअटर आर्टचे विद्यार्थी, छात्र भारती विद्यार्थी संघटना, एआयएसएफचे कार्यकर्ते यांनी (१३ जानेवारी) सकाळपासून ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. आमदार कपिल पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर रात्री ११.३० वाजता सोमण यांना रजेवर पाठवत असल्याचे पत्र कुलसचिवांनी आणून दिल्यानंतर अकॅडमी ऑफ थिअटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती, छात्र भारती मुंबई विद्यापीठ अध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांनी दिली.
गाणी गात, निषेध करत अंहिसेच्या मार्गाने मुलांचे आंदोलन सुरू होतं. रात्रभर चाललेल्या या आंदोलनात अकॅडमी ऑफ थिअटर आर्टचे अपूर्व इंगळे आणि सहकारी, एआयएसएफचे शंभुक संकल्पना उदय, अमीर काझी, छात्र भारतीचे सागर भालेराव, अमरीन मोगर, सचिन बनसोडे, रोहित ढाले, दिशा विद्यार्थी संघटनेचे बबन ठोके यांनी सहभाग घेतला होता. दिवसभरात दोनदा विद्यापीठ अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले. पण विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. रात्री उशिरा येऊन आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. कुलगुरूंना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर कुलगुरू यांनी योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवून, सत्यशोधन समिती गठीत करण्यात येईल असे पत्रच कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते आंदोलक विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केले.
गेल्या सहा महिन्यांपासून नाट्य शास्त्राच्या मुलांना शिकवण्यासाठी प्रध्यापक नसल्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांवर एक विशिष्ट विचारथारा थोपवली जात आहे. हंगामी शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भोंगळ कारभार करणाऱ्या एमटीएचे संचालक योगेश सोमण यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या. विद्यापीठ प्रशासनाशी वारवारं चर्चा करूनही विद्यार्थ्यांचा कोणताही प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेला नाही, त्यामुळे अकॅडमी ऑफ थिअटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी संघटीतपणे ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला होता. छात्र भारती आणि एआयएसएफचे सुरवातीपासून या आंदोलनाला पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
मुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत