श्रीगोंदा दि, ०८ :- श्रीगोंदा तहसील कार्यालय हे तालुक्याचे वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या तहसील कार्यालयात आज दि.८ रोजी दुपारी नाग या प्रजातीचा विषारी साप निघाल्याने कार्यालयात सुटीच्या दिवशी राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात खिडक्यांच्या फुटलेल्या काचा तसेच परिसरात वाढलेले गवत त्यामुळे या परिसरात साप तसेच इतर सरपटणारे प्राणी यांचा वावर वाढला आहे. त्यातच आज दुसरा शनिवार असल्याने कार्यालयाला सुटी असल्याने सुटीच्या दिवशी अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात अचानक अडीच-तीन फुटाचा विषारी प्रजातीचा साप दिसल्याने पुरवठा विभागातील अधिकारी दत्तात्रय साळुंके त्यांचे सहकारी त्याचबरोबर तालुक्यात कामानिमित्त आलेल्या काही लोकांची कार्यालयात साप दिसल्याने गडबडून गेले. कसेबसे त्याला कार्यालयाबाहेर बाहेर काढीत सर्पमित्र मंदिलकर याना पाचारण करून सापाला पकडण्यात आल्या नंतर त्यांनी पकडलेला साप हा अडीच-तीन फुटाचा असून विषारी प्रजातीमधील असल्याचे यावेळी सांगितले. पकडलेल्या सापाला मोकळ्या रानात सोडण्यात येणार असल्याचे त्यांने सांगितले आहे.
विविध शासकीय अनुदानासाठी व कामासाठी कागदपत्रांचे साप सोडणाऱ्या तहसील कार्यालयात निघालेल्या खऱ्या सापाची चर्चा शहरात दिवसभर दिसून येत होती.
चौकट :
श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात श्रीगोंदा पोलीस ठाण्यांने तसेच तहसील कार्यालय यांनी जप्त केलेली वाळूची वाहने,खिडक्यांच्या फुटलेल्या काचा तसेच वाढलेले गवत त्यामुळे या परिसरात साप तसेच इतर सरपटणारे प्राणी यांचा वावर वाढला आहे. सुदैवाने आज दुसरा शनिवार असल्याने येथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची तसेच कर्मचाऱ्यांची गर्दी कमी असल्याने होणारा मोठा धोका टळला आहे तरी मा. तहसिलदार साहेबांनी परिसरात असलेला कचरा हटवण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी दक्ष नागरिक फौंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-योगेश चंदन