आरवली दि ०९ : – प्रतीनीधी, राजिवली गृप ग्रामपंचायत उपसरपंच संतोष येडगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटोळे , दत्ताराम काळंबे , प्रकाश काळंबे यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांची भेट घेत काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील भुखंड ताब्यात देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती केली व राजिवली काळंबेवाडी आणि इतर प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा करण्यासाठी गडनदी प्रकल्प पाहणी दौरा करण्याची विनंती केली होती पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार १२ फेब्रुवारी ला गडनदी पाहणी दौरा करणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या गडनदी धरणातील पुनर्वसन झालेल्या आणि होत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे गडनदी धरणामुळे बाधीत झालेल्या राजिवली काळंबेवाडी चे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त अनेक वर्षांपासून लढा देत आहेत मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे पुनर्वसनांच्या कामांना खिळ बसली होती रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी २९ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून काळंबेवाडी पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना ही केल्या होत्या त्यानुसार कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांनी जून २०१९ मध्ये काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणाची पाहणी करुन भुखंड रेखांकन संदर्भात उपविभागीय अभियंत्यांना सुचना दिल्या होत्या तर नगररचनाकार श्री.जोशी यांच्याकडील भुखंड रेखांकन प्रस्तावाला रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री.बेलदार यांनी गती दिल्याने तातडीने प्रस्ताव भुमिअभिलेख ला सादर करण्यात आला. सद्यस्थितीत काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील भुखंड प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे दि.१२ फेब्रुवारी २०२० रोजी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार गडनदी प्रकल्पबाधीत काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणाची पाहणी करुन भुखंड प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यात देण्यासंदर्भात संबंधित विभागांना सुचना करणार आहेत तर नव्याने निर्माण होणाऱ्या गावठाणाला नागरी सुविधा पुरविण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांसोबत संवाद साधून पुढील मंजुरीचे निर्णय घेणार आहेत.
राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा पुर्णत्वास जावून त्या ठिकाणी महाराष्ट्रात एक आदर्श गावठाण निर्माण व्हावे म्हणून संतोष येडगे प्रयत्नशील असून त्यासाठी त्यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांची ही भेट घेत चर्चा केली आहे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाण विकसीत करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसून आपण सकारात्मक असल्याचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांनी संतोष येडगे यांना आश्वासन दिले आहे त्यानुसार कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी आणि रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली लघुपाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले काम करत असून स्थानिक पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांच्या समन्वयातून एका आदर्श पुनर्वसन गावठाणाची निर्मिती होईल असा विश्वास यावेळी संतोष येडगे यांनी व्यक्त केला या प्रकरणी आणखी सक्षम पाठपुरावा करण्यासाठी ग्रामपंचायत मागे राहणार नसल्याचे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष येडगे म्हणाले.
रत्नागिरी प्रतिनिधी ;- संतोष येडगे