पुणे दि. 12: – देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बँकांचे महत्त्व लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला. सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बँकांची महत्वाची जबाबदारी आहे. जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले.
राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचा ‘एनआयबीएम’ सुवर्णमहोत्सवी सोहळा राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, परिवहन तथा संसदीय कार्यमंत्री ॲड अनिल परब, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेन्टचे संचालक डॉ. के. एल. धिंग्रा उपस्थित होते.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, बँका या आमच्या आर्थिक व्यवस्थेच्या भरभराटीचे निदर्शक आहेत. बँकांनी आपल्या कार्यक्षमतेमुळे लोकांचा विश्वास आणि आदर मिळविला आहे. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये बँकांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी, बँकिंग क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतरच्या कालावधीत बँकिंग क्षेत्राने केलेली प्रगती समाधानकारक आहे. देशातील बहुतांश खेड्यांमध्ये बँकांच्या शाखा आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियामक निरीक्षणानेही बँकिंग कार्यात अधिक स्थिरता आणली आहे. नियामक म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाची भूमिका व्यापक करण्यात आली आहे. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल आणि आमच्या आर्थिक प्रणाली अधिक विश्वासार्ह बनतील, असा विश्वास श्री. कोविंद यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले, क्षमता वाढीसाठी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेची ‘एनआयबीएम’ स्थापना ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकांच्या दूरदृष्टीचे द्योतक होती. बँक व्यवस्थापनात संशोधन, प्रशिक्षण, शिक्षण आणि सल्ला यासाठी स्वायत्त शिखर संस्था म्हणून संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक बँकर्स प्रशिक्षित आहेत. एनआयबीएममध्ये चांगल्या संशोधन सुविधा आहेत. या सुविधांचा उपयोग गरीब घटकांसाठी आर्थिक उत्पादने तयार करण्यासाठी केला जाणे आवश्यक आहे. देशाची प्रगती गरिबांच्या सामूहिक आर्थिक सामर्थ्याच्या योगदानावर अवलंबून असल्याचे श्री. कोविंद यांनी सांगितले.
‘दिव्यांग’ व्यक्तींशी झालेल्या संवादातून त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता दिसून आल्याचे सांगून राष्ट्रपती कोविंद म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘दिव्यांग’ व्यक्तींना बँकिंग सुविधांमध्ये सहज प्रवेश मिळण्यासाठी विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांना आर्थिक सेवांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व उपाययोजना कृतीशीलतेने कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनआयबीएम संस्थेच्या कार्याची माहिती असलेल्या पुस्तिकेचे, टपाल तिकीटाचे प्रकाशन तसेच बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचे महत्त्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचे ‘एनआयबीएम’ संचालक डॉ. के. एल. धिंग्रा यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, गव्हर्निंग बोर्डचे सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.