पुणे,दि.१: राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्यामुळे सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ, पुण्यातील राजपत्रित अधिकारी व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतली. पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याची शपथ अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली.यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षा तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे,जिल्हा सरचिटणीस विठ्ठल वाघमारे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री. गायकवाड यांनी पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे वाढलेल्या जबाबदारीची जाणीव उपस्थित सर्वांना करुन दिली. नागरिकांप्रती आपुलकी ठेवून, लोकाभिमुख राहून सर्वांनी शासकीय सेवा बजवावी, तसेच प्रत्येकाने शासनाप्रति कर्तव्य पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.डॉ.कटारे यांनी राज्य शासनाकडे पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी महासंघाने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्य शासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करुन चांगला निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्यांप्रती राज्य शासन सकारात्मक आहे. त्यामुळे नागरिकांना चांगली सेवा देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या कामासाठी आपण सारे वचनबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी केले.वाघमारे म्हणाले, नागरिकांचे काम काल मर्यादेत पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन करावे. राज्य शासनाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरु होता, त्यापैकी ही महत्वाची मागणी मान्य झाली आहे.
‘महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे अथक प्रयत्नशील राहून कार्यालयीन कामाच्या वेळेत नागरिकांची कामे अधिक वेगाने आणि सकारात्मक दृष्टीने करुया. अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा अथवा सुट्ट्यांमुळे नागरिकांच्या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. आमची ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्साह याद्वारे वैभवशाली महाराष्ट्राच्या उभारणीसाठी वचनबद्ध राहूया..’ अशी शपथ यावेळी घेण्यात आली.