पिंपरी चिंचवड दि ०९ :- पुण्याहून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी जगताप डेअरी चौकातील पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाकडून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्या हस्ते सोमवार दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. यावेळी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मा. स्थायी समिती सभापती ममताताई गायकवाड, नगरसेवक संदीप कस्पटे, नगरसेवक बापू काटे, नगरसेविका आरतीताई चौंधे, नगरसेविका निर्मलाताई कुटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, वाकड फेडरेशनचे माजी अध्यक्ष सुरेश राजे , सेक्रेटरी के.सी.गर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
गेल्या वर्षी पूल प्राधिकरणाकडून दोन पुलांपैकी काळेवाडीकडून पुण्याकडे जाणारा एक पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या ७०० मीटर लांबी आणि ८ मीटर रुंदी असलेल्या पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्यात आले असून हा मार्ग खुला करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाण्याच्या वाहनांना जगताप डेअरी चौकामधून वळसा मारून जावे लागत होते. याचा परिणाम म्हणून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत महापालिकेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नगरसेवकांनी प्राधिकरणाकडे पूल खुला करण्याची मागणी केली होती. परंतु, प्राधिकरणाकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी हा पुल वाहतुकीसाठी खुला केला. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांच्या वेळेत बचत होणार असून वाहतुकीची मोठी समस्या सुटणार आहे