मुंबई दि ११ :- जातपडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण केल्यास, संबंधित व्यक्तीचा पुढील त्रास वाचेल, त्यामुळे ज्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते, त्याची जातपडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने आज विधानसभेत सादर केलेल्या जातपडताळणी सुधारणा विधेयकावर ते बोलत होते.श्री. पाटील म्हणाले की, सध्या राज्याच्या जातपडताळणी विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती नोकरी, प्रवेश प्रक्रिया, निवडणूक आदी कारणांसाठी जातपडताळणी विभागात आल्यानंतरच ती प्रक्रिया सुरु केली जाते. त्यामुळे एकीकडे जातपडळणी विभागाची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे जातपडताळणीच्या प्रक्रियेला लागणारा विलंब पाहता, शालेय जीवनातच जातपडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी.ते पुढे म्हणाले की, जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्याची वहित कालमर्यादा पूर्वी तीन महिन्याची होती, ती वाढवून पुढे सहा महिने करण्यात आली. आता पुन्हा ती वाढवून एक वर्ष का करण्यात येत आहे, असा सवालही श्री. पाटील यांनी यावेळी विचारला.