संगमेश्वर दि २०:- संगमेश्वर तालुक्यातील गडनदी मध्यम प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या घेवून संतोष येडगे यांनी दि. १९ मार्च २०२१ रोजी मंत्रालयात जावून सचिव नागेंद्र शिंदे व कोकण पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांची भेट घेत प्रकल्पग्रस्ताच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. संतोष येडगे यांनी विनंती केली असता आपण लवकरच गडनदी पुनर्वसन गावठाणातील समस्या पाहणीसाठी दौरा करणार असल्याचे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले या बैठकीत म्हणाले. आपले सर्वस्व गमावून प्रकल्पासाठी त्याग करत कवडीमोल दराने शासनाला जमिनी देणा-या प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा कामे मार्गी लागावीत म्हणून संतोष येडगे वारंवार पाठपुरावा करत आहेत. या कामी ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचे मार्गदर्शन घेत आहेत प्रस्तावित कामांसाठी स्वत पुढाकार घेत मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा होत असल्याने पुनर्वसन कामे मार्गी लागतील असा विश्वास संतोष येडगे यांनी व्यक्त केला आहे.
गडनदी बाधित खेरशेत, नांदगाव, राजिवली शिर्केवाडी, घाडगेवाडी आदी शासकीय गावठाणातील समस्यांसह नव्याने निर्माण होत असलेल्या काळंबेवाडी आणि पुरग्रस्त रातांबी गावाची पाहणी करणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. तर प्रकल्पग्रस्तांसाठी आवश्यक असणारी कामे या हंगामात मंजुर करण्यासाठी शासन स्तरावर योग्य ते सहकार्य करणार असल्याचे आश्वासन कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी या बैठकीत दिले.
गडनदी पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा अनेक कामे ही जीर्ण झाली असून सध्या ही सर्व कामे पाटबंधारे विभागाकडे आहेत या कामांची दुरुस्ती करणे अनिवार्य असताना या कामांकडे लक्ष दिले जात नाही त्यामुळे गावठाणातील अंतर्गत रस्ते, गटारे, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, आदी नादुरुस्त कामांमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त त्रस्त असल्याची बाब संतोष येडगे यांनी कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या निदर्शनास आणून दिली तर गडनदी प्रकल्पासाठी पुनर्वसन कामांच्या नाममात्र खर्चासहीत ९५० कोटी रुपये खर्च होवू शकतो तर ज्यांनी आपली स्वप्न त्यागून आणि पिढ्यानपिढ्यांची जमिन शासनाला नाममात्र कवडीमोल दराने देवून ही शासन या प्रकल्पग्रस्तांसाठी आवश्यक खर्च झाला तर बिघडले कुठे असा मुद्दा या बैठकीत मांडला असता कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी बैठकीत सकारात्मक तोडगा काढत आपण गावठाणांची पाहणी करुन प्रकल्पग्रस्तांची नागरी सुविधा कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या गडनदी पुनर्वसन पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने आपण खेरशेत, नांदगाव, शिर्केवाडी, घाडगेवाडी, काळंबेवाडी , रातांबी आदी सर्व प्रकल्पग्रस्तांसोबत संवाद साधून त्यांच्या पाठींब्याने पुनर्वसन संबंधित सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे व त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे संतोष येडगे यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी प्रतिनिधी :- संतोष येडगे