पुणे, दि.२३ :- पुणे शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे पुणे शहरात खून व दहशत निर्माण करणाऱ्या महादेव बाळासाहेब आदलिंगे याच्यासह 7 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवली असून अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 60 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय-28 रा. जुनी तांबेवस्ती, दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली), मयत टोळी सदस्य स्वागत बापु खैरे (वय-25 रा. उरुळी कांचन),टोळी सदस्य पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय-29 रा. भवरापुर रोड, उरुळी कांचन), उमेश सोपान सोनवणे (वय-35 रा. मु.पो. राहु, ता. दौंड), अभिजीत अर्जुन यादव
(वय-22 रा. मेडद, ता. बारामती), आकाश उर्फ बाळु जगन्नाथ वाघमोडे (वय-28 रा. पटेल चौक, कुर्डूवाडी, ता. माढा), महेश भाऊसाहेब सोनवणे(वय-28 रा. भांडवाडी वस्ती, राहु, ता. दौंड) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.महादेव आदिलिंगे आणि त्याच्या साथिदारांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळी वर्चस्व व दहशत माजवण्यासाठी खुन ,खुनाचा प्रयत्न, खुनाची सुपारी देणे, विना परवाना शस्त्र बाळगणे, दुखापत, हल्ल्याची पूर्व तयारी, गृहअतिक्रमण,
बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करुन दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.आरोपींनी आपल्या टोळीची दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी आरोपी उमेश सोनवणे याच्या भावाचा 2011 मध्ये झालेल्या खूनाचा बदला घेण्यासाठीआणि अवैध वाळु व्यवसाय करण्यासाठी सराईत गुन्हेगार संतोष संपतराव जगताप याचा भरदिवसा गोळ्या घालून खून केला होता.आरोपींविरुद्ध पुणे शहर पुणे रेल्वे , पुणे ग्रामीण पिंपरी-चिंचवड सोलापूर , उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण
यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते करीत आहेत.आयुक्तांची 60 वी मोक्का कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 60 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण,पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे , पोलीस अंमलदार गणेश सातपुते, संदिप धनवटे, गणेश भापकर, मल्हारी ढमढेरे यांनी केली आहे.