पुणे,दि.२३:- क्वेस्ट ग्लोबल एक जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि जीवनचक्र सेवा कंपनीने पुण्याच्या बाणेर आणि बालेवाडी भागातील वंचित समुदायांसाठी पुढाकार घेत विविध उपक्रमांचे आयोजन केले.
क्वेस्ट ग्लोबल ने वाय ४ डी फाउंडेशनच्या सहकार्याने केलेल्या या उपक्रमात त्यांनी सुरूवातीला लस जनजागृती मोहीम केली. या जागरूकता अभियानाचा मुख्य हेतू असा होता की कोरोना ला हरवण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, त्याकरिता वंचित समुदायातील नागरिकांना याबाबत जनजागृती करून लसीकरणासाठी प्रेरीत करायला हवे. यासाठी नागरिकांना वैयक्तिक स्वरूपात समुपदेशन देखील करण्यात आले. त्यानंतर, दिनांक १६ नोहेंबर २०२१ रोजी लक्ष्मी नगर, बालेवाडी या भागात मोफत आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोबतच, नागरिकांना आरोग्यासंबंधीत सल्ले देखील देण्यात आले. साधारणतः २१० नागरिकांना या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यात आला. या शिबिरामध्ये सॅनिटाइजर, मास्क, इम्युनिटी बूस्टरच्या औषधांचा देखील समावेश होता.
सध्याची परिस्थिती पाहता, कोरोना ला हरवण्यासाठी याबाबतीत जागरूकता पुन्हा नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे होते. सोबतच, नागरिकांना कोरोना अजून संपला नाही हे लक्षात आणून देऊन त्यांना आरोग्याविषयक सल्ले देणे आवश्यक आहे, या सर्वांचा विचार करून क्वेस्ट ग्लोबल आणि वाय ४ डी फाउंडेशन ने या अत्यंत आवश्यक उपक्रमांचे आयोजन केले. तसेच, या उपक्रमाला नगरसेवक अमोल बालवडकर यांनी देखील भेट दिली. संबंधित भागातील नागरिकांनी या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.