मुंबई,दि.२०:- लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
जागावाटपाची चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. 21 मार्च रोजी मुंबईत जागावाटपाबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
यानुसार, राज्यातील 48 पैकी 23 जागा उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहेत. 15 जागा काँग्रेसला मिळणार आहेत. तर, 6 जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार असल्याचं समोर येत आहे. प्रकाश आंबेडकर एकत्र लढले तर त्यांना 4 जागा दिल्या जातील. ते एकत्र न आल्यास या जागा काँग्रेसच्या वाट्याला जातील, म्हणजेच काँग्रेस 19 जागांवर लढेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या जागावाटपाबाबत 21 मार्च रोजी मुंबईत घोषणा होण्याची शक्यता आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे. संध्याकाळी 4 वाजता महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांबाबत निर्णय घेण्याकरता ही बैठक होईल. केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीनंतर राज्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी काँग्रेसचे नेते दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत काँग्रेसची बैठक पार पडली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधून विकास ठाकरेंचं नाव आघाडीवर आहे. नागपूरहून विकास ठाकरेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा सामना नितीन गडकरींविरुद्ध होणार आहे. कारण भाजपने आधीच नागपूरमधून गडकरींच्या नावाची घोषणा केली आहे.