पुणे, दि. २६ : मावळ तालुक्यातील एकविरा देवी पायथा ते कार्ला मंदिर ते कार्ला मळवली दरम्यान मौजे कार्ला येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा रस्ता ३० जुलै ते २८ ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
मौजे कार्ला गावातून मळवली-भाजे गावाकडे जाण्यासाठी आणि मौजे मळवली-सदापुरमार्गे वाकसाई फाटा अशी सर्व प्रकारची सर्व प्रकारची वाहतूक बंद करुन ती मौजे कार्ला- वाकसाई फाटा- सदापुर मार्ग मळवली व भाजेगावाकडे वळविण्यात येईल. मौजे कुसगांव-औंढे-मळवली येथे पर्यटनासाठी येणाऱ्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करुन मळवली-औंढे-कुसगांव अशी एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. मौजे भाजे येथील धबधबा व मळवली येथे पर्यटकांच्या चारचाकी वाहनांसाठी जुन्या महामार्गाने मौजे वाकसाई फाटा- सदापूर-मळवली-भाजे या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
मौजे पाथरगांव-बोरज-मळवली गावाकडे जाण्यासाठी एकेरी वाहतुक करावी. मौजे मळवली येथील वाहने देवले मार्गे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गे आणि मळवली-औंढे- कुसगांव-लोणावळा जुन्या महामार्गानी पर्यटकांची चारचाकी वाहने येतील.
मौजे भाते ते लोहगडकडे जाण्यासाठी एकेरी वाहतुक करण्यात येत आहे. मौजे लोहगड येथून पुणे-मुंबईकडे जाणारी चारचाकी वाहने लोहगड-दुधिवरे खिंड- औंढोली- औंढे यामार्गे पुणे मुंबई व मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जातील किंवा लोहगड-दुधिवरे खिंड- पवनानगर या मार्गे नवीन पुणे-मुंबई व मुंबई-पुणे या मार्गाचा वापर करावा.
तसेच लोहगड येथून मुंबई किंवा पुणेकडे जाणारी दुचाकी व तिनचाकी वाहने लोहगड-दुधिवरे खिंड- औंढोली- औंढ- औंढे ब्रिज वरुन कुसगांव- लोणावळा येथून जुना मुंबई-पुणे या मार्गाचा वापर करतील. सदर कालावधीत जुना पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाटा ते वेहेरगांव या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.