मुंबई, दि. ८ : –महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला पावसासाठी आणखी कळ सोसावी लागणार आहे. सर्वसाधारणपणे ७ ते १० जूनपर्यंत राज्यात दाखल होणारा मान्सून यंदा उशिरा पोहोचणार आहे. १७ जूननंतरच मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असून, संपूर्ण राज्यात त्याचा प्रभाव जाणवण्यास २८ जून उजाडणार आहे. दरम्यान, आज, शनिवारी केरळमध्ये मान्सून येण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने गुरुवारी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या सहयोगाने माध्यमांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्रातील पाऊसस्थितीचा अंदाज मांडला. ‘येत्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार १३ जूननंतर राज्यात पावसाला सुरुवात होऊ शकते. १० जूननंतर कोकणात पाऊस पडेल. मात्र २० जूनपर्यंत अंतर्भागात आणि किनारपट्टीवरही पाऊस सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. २८ जूननंतर पावसाचा सर्वदूर संचार होईल, असे सध्याचे चित्र आहे. मात्र हवामान विभागाचा अंदाज ज्या मॉडेल्सवर आधारित आहे, त्या मॉडेलनुसार सर्वाधिक अचूक अंदाज दोन आठवड्यांपर्यंत देता येतो. त्यामुळे राज्यातील पावसासंदर्भात अधिक अचूक अंदाज मिळण्यासाठी आणखी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागेल’, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २० जूनपर्यंत फारसे सकारात्मक चित्र नाही. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अरबी समुद्रातील शाखा राज्यासाठी फारशी सक्रिय झालेली नसली, तरी बंगालच्या उपसागरातील शाखा विदर्भाचा काही भाग आणि मराठवाडा यांच्यासाठी सक्रिय झालेली दिसेल. त्यानंतर अरबी समुद्रातील शाखाही २८ जूनपासून सक्रिय होऊन कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आहे. पुढील आठ दिवसांमध्ये कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र तो किती दिवस राहील, याबद्दल सध्या कोणताही अंदाज वर्तवता येत नाही. त्यामुळेच कोकणातील पावसावरून राज्यात मान्सूनचे आगमन झाले, असे खात्रीपूर्वक म्हणता येईल का, याबद्दलही सध्या थेट भाष्य करता येणार नाही. सध्या केरळ-कर्नाटक किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा उत्तर ते वायव्य पट्ट्यातून पुढे वेगाने सरकण्याची शक्यता आहे. तसेच त्याची तीव्रताही आणखी वाढू शकते.