तलासरी दि.२२ :- तलासरी तालुक्यातील आदिवासी बहुल डोंगरदऱ्यात निसर्गरम्य जीवन जगणाऱ्या आदिवासी विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सूर्यमाला हाताळली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. ही अध्यापन संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी भूगोल अध्यापनात एक्सप्लोअर फॉर मर्ज क्यूब मोबाइल अँपचा वापर
केला.मोबाईलच्या साहाय्याने सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ ,नेपच्यून ग्रह आणि थ्रीडी सूर्यमाला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळवून दिली. त्यासाठी त्यांनी गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध असलेले एक्सप्लोअर फॉर मर्ज क्यूब प्रिंट आउट काढून त्याचा क्यूब बनवून मोबाईलद्वारे मुलांना वर्गात ही सूर्यमाला हाताळण्याचा आनंद पूर्ण अध्ययन अनुभव दिला.सदर थ्रीडी सूर्यमाला फिरत असताना आपल्याला पाहिजे असलेल्या गोलावर क्लिक करून त्याची माहिती देखील मिळते. त्यांच्या या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक व सह सर्व सहकारी शिक्षक यांनी त्यांचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी इयत्ता सहावी, सातवीतील शंभर मुलींची मंगळ ग्रहावर नाव नोंदणी करून महिलांचा अनोखा सन्मान देखील केला आहे.त्यांचे बोर्डिंग पास देखील उपलब्ध करून दिले आहेत.
🌞 सूर्यमाला🌞
दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत इयत्ता पाचवीच्या विज्ञान -परीसर अभ्यास विषयातील आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा घटक शिकवताना पाठय घटक प्रभावी होण्यासाठी एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब या मोबाईल अॅपचा कल्पकतेने वापर केला अन् सूर्य, बुध, शुक्र, गुरू,आपण ज्या ग्रहावर राहतो तो पृथ्वी ग्रह, लाल तांबूस मंगळ ग्रह, कडा असलेला शनि पाहून मुलांची जिज्ञासा आणखीच वाढली. त्यामुळे शिकण्यातला आनंद मुलांनी घेतला आणि प्रत्यक्ष सूर्यमालाच अनुभवली