पुणे, दि, २७ :- नादम संस्थेतर्फे आयोजित अनंथपुरी या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यमहोत्सवात नृत्यार्थी कलाक्षेत्रमच्या नृत्यगुरु राजसी वाघ यांना युवा नाट्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नृत्यगुरु जॉय राधाकृष्णन आणि मोहिनीअट्टम नृत्यगुरु विनिता शशीधरन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या महोत्सवात नृत्यर्थी कलाक्षेत्रमच्या आकांक्षा शहापूरकर आणि अनिता बोंद्रे यांना नाट्यप्रभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कुठलीही कला आत्मसात करण्यासाठी केवळ साधना पुरेशी नसते, तर साधनेला तपस्येची जोड मिळणे आवश्यक असते, असे मत राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
राजसीने यावेळी भरतनाट्यमवर आधारित एकल नृत्यप्रकारात शब्दम, तर आकांक्षा हिने तिल्लाना आणि अनिताने तोडेमंगलंम हा नृत्याविष्कार सादर केला. त्यास रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात विविध राज्यातून आलेले दोनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.