मुंबई उपनगर दि ०५ :- प्रतिनिधी हैदराबाद येथे झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी दि 2 डिसेंबर 2019 रोजी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तेव्हा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले…हैदराबाद येथे डॉक्टर प्रियांका रेड्डी या कामावरून परतत होत्या आणि त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या स्कूटरचे चाक पंक्चर झाले होते, त्याचवेळी काही इसमांनी त्यांना चाक पंक्चर असून पुढे जाणे शक्य नसल्याचे सांगितले. बहीण भावना यांनी प्रियांका रेडींना टोलनाक्यावर थांबण्यास सांगितले, परंतु एकटे थांबणे बरोबर नाही असे प्रियांका म्हणाल्या आणि निघाल्या. त्याच वेळेस त्यांना एका इसमाने थांबविले आणि सगळी दुकाने बंद आहेत, एक मुलगा येऊन पंक्चर काढून देईल असे सांगितले. ती मंडळी शंकास्पद असल्याचे देखील प्रियांका यांनी बहिणीला सांगितले होते. रात्री ९.४४ वाजता प्रियांका यांचा फोन स्विचऑफ लागल्याने त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी प्रियांका यांची बॉडी पूर्ण जळालेल्या अवस्थेत सापडली आणि सामूहिक बलात्कार झाल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. र्हदयाचा थरकाप उडवणारी आणि काळीज पिळवटून काढणारी ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते. या विकृत कृत्यांना कधी आळा बसणार याचे उत्तरच कोणाकडे नसल्याचे दिसते आहे. अशा नराधमांना कडक शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. जर यावर तात्काळ पावले उचलली गेली नाहीत तर यंग पृथ्वी फाऊंडेशन व तेजस्वीनी महिला ग्रुप तर्फे मोठे आंदोलन देशभर उभे असेल. पुन्हा आपण त्याच प्रश्नाकडे येऊन थांबलोय. खरंच आपला देश महिलांसाठी सुरक्षित आहे का? ह्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, अन्यथा यंग पृथ्वी फाऊंडेशन व तेजस्वीनी महिला ग्रुप मार्फत देशात मोठे आंदोलन उभे करु असा विनंतीपुर्वक इशारा आज मा. जिल्हाधिकारी पुणे मार्फत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
हा मोर्चा यंग पृथ्वी फाऊंडेशन च्या अध्यक्ष सपनाताई माळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. तेव्हा फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा अश्विनीताई वाघ, सुनीताताई भगत, वंदनाताई मोडक, रोहिणीताई सावंत, पुजाताई सावंत, दिपालीताई कवडे, अर्चनाताई शहा, वनिताताई देशकर, प्राचीताई दुधाने, संतोष शिंदे, महादेव मातेरे, संदीप लहाने, प्रमोद धुमाळ आदी उपस्थित होते.
*आधी दिल्ली, उन्नाव ,कथुवा, कोपर्डी आणि आता हैदराबाद.
प्रत्येक वेळी आम्ही दुःख व्यक्त करायचं, डी.पी. ला काळा डाग सेट करायचा, स्टेटस मध्ये संबंधित ताईचा फोटो टाकायचा.फार झालं तर कँडल मार्च काढायचा एक दोन दिवस प्रॉटेस्ट की काय ते करायचं आणि पुन्हा आपल्या चाकोरी बद्ध आयुष्यात या देशाचं काही नाही होणार म्हणत रममाण व्हायचं. पुन्हा 2-4 महिन्यात आहेच मग एखादी नवीन घटना,नवीन स्टेटस,नवीन प्रोटेस्ट. या भारत देशाचा जागृत नागरिक म्हणून सशक्त युवक म्हणून आम्ही शांत कधी पर्यंत बसायचं. देशाच्या राजधानी दिल्लीत होणारी घटना पुरोगामी महाराष्ट्रात झाली. आता तीच घटना आमचं दार वाजवून घरापुढे उभी राहायची वाट बघायची आहे का..?
आम्हाला शिवाजी राजे शिकवायला नको पाहिजे होते म्हणजे महिला विषयी आदर वाटलाच नसता. आम्हाला संभाजी राजे शिकवलेच नसते तर अन्याया विरूद्ध पेटून उठवाच वाटलं नसतं. आम्ही विवेकानंदांना आदर्श मानायलाच नको होत म्हणजे स्वच्छ चारित्र्य कळलच नसतं. आम्ही महात्मा फुले शिकवायला नको होते ज्यांनी समतेचा विचार जगाला सांगितला, आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचायलाच नको होते म्हणजे घटनादत्त अधिकाराची आणि त्याची होणारी गळचेपी याची जाणीव झाली नसती. छातीमध्ये धग आणि मनगटात रग असणारा युवक जग उलटवून टाकू शकतो. दिल्ली,उन्नाव ,कथुवा, कोपर्डी सगळे आरोपी अजून कायदेशीर प्रक्रियेतून मार्ग शोधत आहेत. एका निष्पाप, निरागस, गोजिरवाण्या, सुंदर जीवाला न्यायासाठी इतकी वाट पहावी लागत असेल तर गरज आहे न्यायासाठी समांतर व्यवस्था उभारण्याची. आणखी डोळे मिटून शांत राहून मी काही पाहिलच नाही या अविर्भात नाटक मी करू शकत नाही. आता गरज आहे उठून उभं राहण्याची. तेव्हा आमच्या प्रमुख मागण्या याच आहेत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना बलात्कारी नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, जर आपल्याला न्याय देता येत नसेल तर आरोपींना जनतेच्या हवाली करा, आणि जर हे ही जमणार नसेल तर महिलांना हत्यारे बाळगण्याची परवानगी जाहीर करा. आणि वरील मागण्या पूर्ण करु शकत नसाल तर मात्र आपल्या खुर्च्या खाली करा. अन्यथा देशभर तीव्र आंदोलन छेडू असा आक्रोश सपनाताई माळी यांनी व्यक्त केला…तेव्हा सर्व पक्ष,समविचारी संघटनांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला…
बाळू राऊत मुंबई उपनगर प्रतिनिध