पुणे दि. १० : -पुणे पोलीस आयुक्तालयाची सेवा (सर्व्हिस एक्सलेन्स व्हिक्टीम असिस्टन्स) प्रणाली लोकाभिमुख असून ही प्रणाली राज्यव्यापी राबविण्यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज केले.
येथील पुणे पोलीस आयुक्तालयात सेवा (सर्व्हिस एक्सलेन्स व्हिक्टीम असिस्टंन्स) कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे) संभाजी कदम, पोलीस उपायुक्त अशोक मोराळे उपस्थित होते.
श्री स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, महाराष्ट्र शासनाने सेवा हमी कायदा केला असून हा एक क्रांतीकारी बदल आहे. या कायद्यान्वये गतीमानता, पारदर्शकता आणि कालबध्दतेची बंधने शासकीय विभागांवर आली आहेत. या कायद्याच्या योग्य अंमलबजावणीबरोबरच सर्व सामान्य लोकांना मदत करण्यासाठी राज्यभरात 30 हजार 800 मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पुणे पोलीसांनी यापुढे पाऊल टाकत सेवा (सर्व्हिस एक्सलेन्स व्हिक्टीम असिस्टंन्स) प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली अद्ययावत असून राज्य शासनाच्या 39 विभागांसमोर आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ रवींद्र शिसवे म्हणाले, पारदर्शकता, सेवा आणि तत्पर्ता या संकल्पनेवर आधारित ‘सेवा’ प्रणाली कार्यरत आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारून लोकांचे पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न पोलीस विभाग करत आहे. ही प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तक्रारदार राजेश शहावाला, लक्ष्मण प्रधान, विठ्ठल थोरात, अनिता साळुंखे यांनी आपले अनुभव सांगून पोलिसांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी सेवा कार्यप्रणालीसाठी विशेष योगदानाबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी, एनएनएसचे विद्यार्थी, क्रेडाई संस्थेचे पदाधिकारी यांचा श्री स्वाधीन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आभार पूजा भगत यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.