पुणे दि.१०:– मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी स्वाधीन क्षत्रिय यांनी या अधिनियमांतर्गत येणाऱ्या सर्व सेवा कालमर्यादेत पुरवाव्यात, अशी सूचना केली. या अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा, पदनिर्देशित अधिकारी तसेच अपिलीय अधिकारी यांचा तपशील कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रसिद्ध केला असल्याची खात्री करुन त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महसूल विभागाच्या २१ सेवांच्या सद्यस्थितीची माहिती श्री. क्षत्रिय यांना दिली. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, भूमिहीन शेतमजूर दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, शेतकरी दाखला, अल्पभूधारक दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला आदी महसूल विभागाच्या सेवांच्या अंमलबजावणी बाबत माहिती दिली. यावेळी पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, उप जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, विशेष भुसंपादन अधिकारी श्रीमंत पाटोळे, रेश्मा माळी, सुनील गाडे, आरती भोसले, सुरेखा माने, तहसिलदार अर्चना निकम तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.