बारामती दि. 26: ‘कोराना’चा प्रसार रोखण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून राज्यासह देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा परिणाम इतर गंभीर आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांवर होवू नये यासाठी ‘रुग्ण सहायता कक्षा’शी संपर्क साधण्याचे अवाहन कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ आणि मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीत ‘रुग्ण सहायता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या टाळेबंदीच्या कठीण काळात गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना या ‘रुग्ण सहायता कक्षा’चा मोठा उपयोग होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांच्या गंभीर आजारांवर उपचार केले जातात. मात्र या योजनांची माहिती, तसेच यासाठी कोणाकडे पाठपुरावा करायचा? ही माहिती तसेच त्यासाठीचा वेळही रुग्णांच्या नातेवाईकांच्याकडे नसतो. त्यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णांना शासनाच्या योजनांची एकत्रित माहिती मिळावी आणि रुग्णांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत ‘रुग्ण सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर दि. 26 जानेवारी 2020 रोजी जिल्हा परिषदेच्या इमारतीत या कक्षाची स्थापना करुन कामाची सुरुवात करण्यात आली.
*कसे चालते रुग्ण साहय्यता कक्षाचे काम…*
एक वैद्यकीय अधिकारी, एक अधिक्षक, एक संगणक चालक, एक पर्यवेक्षक आणि एक अटेंडन्स अशा पाच जणांच्या स्टाफवर या रुग्ण सहायता कक्षाचे काम चालते. रुग्ण सहायता कक्षात रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक आल्यानंतर पहिल्यांदा त्यांचे समुदेशन केले जाते. रुग्णाचा आजार, त्याची आर्थिक परिस्थिती समजावून घेतली जाते. पहिल्यांदा रुग्णाला राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेच्या माध्यमातून उपचार करणारे कोणते रुग्णालय त्याला सोईचे आणि जवळचे आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती दिली जाते. या योजनेचा लाभ संबंधित रुग्णाला मिळवून देण्यासाठी रुग्णालयात पाठपुरावा केला जातो.
त्याच प्रमाणे रुग्णांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. काही आजार या योजनेत बसत नसतील अथवा रुग्ण या योजनेचा लाभार्थी होताना काही तांत्रिक अडचणी असतील तर धर्मादाय आयुक्त यांच्याकडून संबंधित रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच बरोबर ऱ्हदय, किडणी, कॅन्सर या आजारांसाठी जिल्हा परिषदेची ‘दुर्धर आजार योजना’ आहे. या अंतर्गत रुग्णाला 15 हजारांची मदत देण्यासाठी प्रयत्न केला जातो. या व्यतिरिक्त काही अत्यावश्यक उपचारांची गरज असल्यास सिव्हिल हॉस्पिटल अथवा ससूनमध्ये रुग्णावर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येते. यासाठी संबंधित रुग्णाची माहिती सिव्हिल हॉस्पिटल अथवा ससूनच्या संबंधित तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याला दिली जाते. रुग्ण बरा होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जातो.
*टाळेबंदीच्या काळात असे चालते काम…*
सध्या एक महिन्यापासून राज्यात टाळेबंदी असल्याने नागरिकांना बाहेर पडण्यावर बंधने आहेत. या काळात प्रत्यक्ष रुग्ण अथवा रुग्णाचा नातेवाईक रुग्ण सहायता कक्षात येण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे दूरध्वनीवर संपर्क साधला तरी संबंधित रुग्णाची माहिती घेवून त्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाते. त्याच्यावर उपचार होवून तो बरा होईल, त्याला योजनेचा लाभ होईल याची काळजी घेतली जाते. या टाळेबंदीच्या कालावधीत गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांसाठी हा रुग्ण सहायता कक्ष अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त ठरत आहे. फोनवरुन कोणी रुग्णाची माहिती दिल्यास संबंधित रुग्णाला कक्षामार्फत फोनव्दारे संपर्क साधला जातो, त्याची सर्व माहिती घेवून त्याला मदत दिली जाते.
*कक्षाव्दारे चालविला जातो व्हॉटस् ॲप ग्रुप…*
या रुग्ण सहायता कक्षाव्दारे एक व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक, सहधर्मदाय आयुक्त, सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, ससूनचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य मित्र यांचा समावेश आहे. या ग्रुपवर नव्याने येणाऱ्या रुग्णांची माहिती टाकली जाते. त्यानुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घेऊन त्या रुग्णावर उपचार होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जातो.
*मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मार्गदर्शन…*
त्याचबरोबर रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीकडून मदत मिळवून देण्यासाठी सुध्दा या कक्षाकडून मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी त्यांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे फॉर्म, त्याला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी दिली जाते. तसेच सिध्दी विनायक ट्रस्ट यांसारख्या इतर माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते.
*बारामतीमधील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालये*
▪निरामय हॉस्पिटल
▪गिरीराज हॉस्पिटल
▪ बारामती हॉस्पिटल
▪भंडारे हॉस्पिटल
▪ मेहता हॉस्पिटल
▪सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल
▪वुमन हॉस्पिटल
(संपूर्ण पुणे जिल्ह्यात इतर खाजगी आणि शासकीय रुग्णालयातही ही योजना कार्यान्वित आहेत.)
*कक्षाच्या माध्यमातून या योजनेतून मिळवून दिली जाते मदत…*
▪महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना
▪आयुष्यमान भारत योजना
▪धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मदत
▪पुणे जिल्हा परिषदेची दुर्धर आजार योजना
▪मुख्यमंत्री सहायता कक्ष
▪श्री सिध्दी विनायक ट्रस्ट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेला ‘रुग्ण सहायता कक्ष’ नवीन जिल्हा परिषद इमारत पुणे येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वीय सहायक सुनिल मुसळे (संपर्क क्रमांक – 9820181821), रुग्ण सहायता कक्षाचे समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत अष्टीकर (संपर्क क्रमांक- 9422267338) यांच्याशी संपर्क साधावा.
*****