पुणे दि २१:- कोरोनाबाधितांसाठी बेड पुण्यात उपलब्ध नसल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवरुन मिळत आहे. मात्र हा दावा धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. तसेच पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात येणे अपेक्षित असेल, तर पालकमंत्री अजित दादा पवार यांनी दिवसातील अर्धा वेळ तरी पुण्यात राहून लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत ही पाटील यांनी व्यक्त केले. पाटील म्हणाले की, पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर कोरोना रुग्णांसाठी आयसीयूमध्ये बेडच शिल्लक नसल्याची माहिती देण्यात येत आहे. हे अतिशय धक्कादायक आहे. पुनश्च हरिओम म्हणत व्यवहार पुन्हा सुरू केल्यानंतरही रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ आली. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. मात्र, तरीही परिस्थिती अजून नियंत्रणात नाही. त्यामुळे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी आता लक्ष घातले पाहिजे. त्यांनी रोज अर्धा दिवस पुण्यात थांबून परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे.ते पुढे म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनात ताळमेळ नाही आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी आता मुंबईत राहण्यापेक्षा पुण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.सकाळचं मुंबईतील काम आटोपून ३-१० रोज पुण्याची आढावा बैठक घ्यावी, अशी सूचनाही श्री. पाटील यांनी केली.तसेच पुण्यातील स्वयंसेवी संस्था, संघटना, मंडळं, तालीम आदींनी पुढाकार घेण्याचे आवाहन ही श्री पाटील यांनी केले. या संस्थांनी ज्यांच्या टेस्ट केल्या आहेत, मात्र अहवाल आले नाहीत, त्यांच्यासाठी योग्य खबरदारी बाळगून क्वॉरंटाईन सेंटर सुरू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.