पुणे दि ०६ : आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बालेवाडी परिसरातअपघाताची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतील एका सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून दुचाकीस्वाराला उडवले त्यानंतर या भरधाव कारने पंक्चरच्या दुकानात घुसून तेथील ३ जणांना उडवून जवळच थांबलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे, तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता बालेवाडीतील ममता चौकात घडली.
संतोष राठोड (वय ३५, रा.काळेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर राजेश सिंग (वय ३७ रा. ताथवडे), आनंद भांडवलकर (वय ३५, बाणेर), दशरथ माने (रा.बाणेर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक एस.डब्ल्यु.निकम यास ताब्यात घेतले आहे. निकम हा सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आहेत.रविवारी दुपारी एक वाजता तो त्याच्या ताब्यातील कार (एम. एच १४ एच. एस.७६९९) घेऊन बालेवाडी येथील हायस्ट्रीट येथून जात होता. मद्यपान केल्याने निकमचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी भरधाव कारने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला धडक बसल्याने त्यावरील दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेली एक व्यक्त खाली पडला. मात्र दुचाकी कारमध्ये अडकल्याने कारने दुचाकीस्वाराला १०० मीटर फरफटत नेले. त्यानंतरही कारचा वेग कमी झाला नाही, अखेर निकमच्या ताब्यातील कार ममता चौकात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका पंक्चरच्या दुकानामध्ये घुसली. दुकानामध्ये पंक्चर काढणारा मुलगा आणि अन्य दोघेजण असे तिघेजण होते. त्यामुळे कारने त्या तिघांनाही उडविले, त्यानंतर जवळच थांबलेल्या टेम्पोला कारची धडक बसली.