सोलापूर दि २४ : -सोलापुरात मटका अड्ड्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेत असलेल्या एका नगरसेवकासह जवळपास 288 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यापैकी 70 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या मटका प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी नगरसेवक सुनील कामाटी याला एका महिन्यानंतर हैदराबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
24 ऑगस्ट सायंकाळी 4च्या सुमारास सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या टीमला सोलापुरातील कुंची कोरवे गल्ली येथील एका इमारतीत मटका घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.या माहिती नुसार गुन्हे शाखेने इमारतीवर धाड टाकली. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पळून जाताना एकाचा यामध्ये मृत्यू झाला होता. या कारवाईत पोलिसांनी घटनेच्या दिवशी 40 जणांवर गुन्हा दाखल करत 28 जणांना ताब्यात घेतलं. घटनेचा तपास करत असताना आतापर्यंत या प्रकरणी 288 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शहरात मटका चालवणाऱ्यापैकी प्रमुख सुत्रधार हा नगरसेवक सुनील कामाटी असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. सोबतच सुनील कामाटीसोबत पोलिस कर्मचारी स्टीफन स्वामी हा देखील भागीदार असल्याचं समोर आल्याने पोलिस आयुक्तांनी पोलिस कर्मचारी स्टीफन स्वामीला अटक करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचे निलंबन देखील करण्यात आले.