पुणे दि २६ :- रिक्रुटमेंट एजन्सी कडून बोलत असल्याचे सांगत एका चांगल्या ठिकाणी नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेला तबल ८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मे ते सप्टेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पाच अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ४३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर गुन्हेगारांवर आयटी ऍक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मगरपट्टा सिटी येथे रहाते. ती एका आयटी कंपनीमध्ये काम करते. तीने नोकरी बदलण्यासाठी एका नोकरीविषयक ऑनलाईन वेबसाईटवर माहिती भरली होती. त्यानूसार तीला संबंधीत वेबसाईटवरुन काही प्रतिनिधींनी फोन केले. त्यांनी चांगल्या पॅकेजची नोकरी देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंग शुल्क म्हणून ११ लाख ९९ हजार ६११ रुपये वेबसाईटच्या लिंकवर ट्रांन्सफर करण्यास भाग पाडले.पैसे भरून देखील नोकरी लागली नाही. यावेळी त्यांनी आरोपी सोबत संपर्क साधला.त्यावेळी आरोपीने ११ लाख ९९ हजार ६११ हजार पैकी ३ लाख ३९ हजार रुपये परत दिले. मात्र उर्वरीत ८ लाख ६० हजार रुपये परत न देता तसेच नोकरी न देता फसवणूक केली. संबंधीत महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावरुन हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. याप्रकरणाचा तपास पो. निरीक्षक एच.टी. कुंभार करत आहेत