पुणे दि १७ :- देशात आपल्या नेत्यांन टार्गेट केले जात आहे. अशा वेळी धवल क्रांती, हरित क्रांती, विज्ञान तंत्रज्ञान संशोधन अशा विविध क्षेत्रात विकासाचा पाया इंदिरा गांधी यांनी घातला. त्यांचे अशा प्रकारचे काम आपल्याला पुन्हा एकदा लोकांपर्यत जाऊन सांगावे लागेल. ते पुन्हा एकदा समजावून घेण्याची लोकांची तयारी आहे गरज आहे ती फक्त आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचण्याची, लोकांपर्यंत पोचण्याचा मार्ग आपल्याला प्रियदर्शनी या सारख्या प्रदर्शनातूनच गवसतो, असे राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी आज येथे सांगितले.
प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा कमल व्यवहारे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सोनाली मारणे, शहर यंवक काँग्रेसचे अध्य़क्ष विशाल मलके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नगरसेवक चंदूशेठ कदम, माजी महापौर रजनी त्रिभुवन, संगीता तिवारी, रमेश अय्यर, सचिन आडेकर, यांच्यासह अनेक आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवनातील सन १९७१चे युद्ध, अणू स्फोट असे ऐतिहासिक संदर्भ असलेली छायाचित्रे बघायला मिळतात असे सांगून ते म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या जीवनापासून स्फूर्ती घेऊन आपण पुन्हा एकदा लोकापर्यंत पोचू या. राज्यात आपण काँग्रेस कार्यकर्त्याला आणि संघटनेला बळ मिळावे म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झालो आहोत. या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आपण जोमाने काम करून काँगेस पक्षाला जनादेश मिळवून देऊ या. आतापासून प्रयत्न केले तर इंदिरा गांधी यांना जसा जनादेश मिळाला होता तसाच जनादेश पुन्हा काँग्रेसला मिळू शकतो, यासाठीचा प्रेरणास्त्रोत म्हणजे स्व. इंदिरा गांधीं होत. त्यांनी बांगलादेशाची निर्मिती केली. सध्या चीन बरोबर असलेल्या तणावाच्या काळात आपले पंतप्रधान अठरावेळी चीनच्या राष्ट्रपतींना भेटले. त्यांच्याशी चर्चाही केली पण त्याचा काय उपयोग झाला हे आपण बघतो आहोत. अशा प्रकारच्या चर्चेत आपण काय भूमिका घेतो हे महत्वाचे असते त्यासाठी वैचारिक बैठक पक्की असावी लागते, जी इंदिरा गांधींकडे होती हे त्यांनी दाखवून दिले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, इंदिरा गांधी यांनी देशाला युद्धात विजय मिळवून दिला. बांगला देशाची निर्मिती केली आणि त्याला जगभरातील देशांचा पाठिंबा मिळवला. हे राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असताना देशात सावकारी पाशातून गरीबांची सुटका करण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण, कसेल त्याची जमीन असे सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे त्यांनी केले कारण त्यांची नाळ या देशातील सर्वसामान्यांशी जोडलेली होती. त्यामुळेच रस्ते किंवा वाहतुकीचे कोणतेही साधन नसलेल्या बेली गावात त्या हत्याकांड झालेल्या दलित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी हत्तीवरून गेल्या होत्या. आज देशात लोकशाही आणि संविधान जीवंत ठेवणे हीच मोठी जबाबदारी असून त्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी इंदिराजींपासून आपण सर्वजण स्फूर्ती घेऊ या, असे आवाहन त्यांनी केले. प्रियदर्शनी या इंदिरा गांधींच्या छायाचित्र प्रदर्शनाचे संयोजक अभय छाजेड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, सन १९७१ चे युद्ध जिंकल्यावर टाईम्स मासिकाने आर्यन लेडी असा इंदिरा गांधीयांचा उल्लेख केला होता. देशात धवल क्रांती, हरित क्रांतीचे स्वन्प पूर्णत्वाला नेण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले. आज देशात सर्जिकल स्ट्राइकचे कौतुक केले जाते पण इंदिरा गांधी यांनी एका देशाचे दोन तुकडे केले यापेक्षा मोठा सर्जिकल स्ट्राइक काय असू शकतो ! आभारप्रदर्शन सोनाली मारणे यांनी केले.या प्रदर्शनात इंदिरा गांधींच्या जीवनातील विविध प्रसंगांची साठ छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. त्यांच्या तरूण वयापासून ते अगदी देशाच्या नेत्या होईपर्यंतचा प्रवास या छायाचित्रातून सहजपणे उलगडतो. त्यात मग ७१ चा विजय असो की अणू स्फोट असे ऐतिहासिक टप्पेही आपल्याला बघायला मिळतात. हे प्रदर्शन दि. १९ नोव्हेंबर (गुरूवारी) म्हणजे इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिना पर्यंत नागरीकांसाठी ठाकरे कलादालनात खुले रहाणार आहे.