पुणे दि,26 :- येत्या 1 डिसेंबर रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 अशी आहे. कोविड 19 (कोरोना)च्या पार्श्वभूमीवर होणारी ही राज्यातील पहिलीच निवडणूक असल्याने प्रशासनाने खूपच काळजी घेवून नियोजन केलेले आहे. ‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्येय्य गाठतांना मतदार आणि निवडणुकीसाठी कार्यरत यंत्रणा यांच्या आरोग्याची आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी पुणे विभागाचा आढावा घेवून करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, पुणे, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ. राजेश देशमुख, डॉ. दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, उपायुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.
पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदार संघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांची संख्या जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे –पुणे – पुरुष 89 हजार 626, स्त्री 46 हजार 958, इतर 27 (एकूण 1 लक्ष 36 हजार 611), सातारा जिल्हा – पुरुष 39 हजार 397, स्त्री 19 हजार 673, इतर 1 (एकूण 59 हजार 71 ), सांगली – पुरुष 57 हजार 569, स्त्री 29 हजार 661, इतर 3 (एकूण 87 हजार 233), कोल्हापूर – पुरुष 62हजार 709 , स्त्री 26हजार 820, इतर 0 (एकूण 89 हजार 529) आणि सोलापूर जिल्हा – पुरुष 41हजार 70, स्त्री 11 हजार 742, इतर 1 (एकूण 53 हजार 813).
शिक्षक मतदार संघातील मतदारांची संख्या जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे- पुणे – पुरुष 15हजार 807, स्त्री 16हजार 371, इतर 23 (एकूण 32 हजार 201), सातारा जिल्हा – पुरुष 5हजार 121, स्त्री 2 हजार 589 , इतर 1 (एकूण 7 हजार 711), सांगली – पुरुष 4 हजार 826, स्त्री 1 हजार 985, इतर 1 (एकूण 6 हजार 812 ), कोल्हापूर – पुरुष 8हजार 878, स्त्री 3हजार 359, इतर 0 (एकूण 12हजार 237) आणि सोलापूर जिल्हा – पुरुष 10 हजार 561, स्त्री 3 हजार 23, इतर 0 (एकूण 13हजार 584).
पुणे पदवीधर मतदार संघासाठी विभागात एकूण मतदान केंद्रे 1 हजार 202 तर शिक्षक मतदार संघासाठी 367 मतदान केंद्रे आहेत. पदवीधर मतदार संघातील जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पुणे 357, सातारा 176, सांगली 191, कोल्हापूर 281 आणि सोलापूर जिल्हा 197 तर शिक्षक मतदार संघातील मतदान केंद्रे- पुणे 125, सातारा 44, सांगली 48, कोल्हापूर 76 आणि सोलापूर 74.
पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघातील मराठी आणि इंग्रजीतील मतदार याद्यांची छपाई पूर्ण झाली असून त्याच्या प्रती राजकीय पक्षांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तहसिल कार्यालयालाही प्रत्येक 5 प्रती पुरविण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेसाठी आणि मतमोजणीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. पदवीधर मतदार संघासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांच्यासह एकूण 7 हजार 41 तर शिक्षक मतदार संघासाठी 3 हजार 116 असे एकूण 10 हजार 157 अधिकारी-कर्मचारी उपलब्ध आहेत. याशिवाय वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी 2हजार 917 आहेत.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक डॉ. निलीमा केरकेटा आणि शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत 17 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मास्टर्स ट्रेनर्स आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण झाले. त्यानंतर सहायक निवडणूक अधिकारी स्तरावर 18 नोव्हेंबर रोजी पहिले, 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान दुसरे प्रशिक्षण झाले. तिसरे प्रशिक्षण 30 नोव्हेंबर रोजी मतदान साहित्य वितरण केंद्रावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर देण्यात येणार आहे. सूक्ष्म निरीक्षकांनाही 24 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणीबाबतचे पहिले प्रशिक्षण 25 नोव्हेंबर रोजी झाले. दुसरे प्रशिक्षण 2 डिसेंबर रोजी बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मतमोजणी केंद्रावर होणार आहे. मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.
पुणे विभागातील सर्व 1 हजार 202 मतदान केंद्रांवर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून किमान मुलभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करुन घेण्यात आलेली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांचे सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेबाबत ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तर शहरी भागासाठी महापालिकांचे अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य आरोग्य अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पदवीधर मतदार संघासाठी 62 उमेदवार असल्याने मतपत्रिकेचा आकार 61 गुणिले 77 सेंटीमीटर इतका आहे. शिक्षक मतदार संघासाठी 35 उमेदवार असल्याने मतपत्रिकेचा आकार 46 गुणिले 61 सेंटीमीटर इतका आहे. ही बाब लक्षात घेवून आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेबकास्टींग तसेच व्हिडीओग्राफीसाठी विद्युत पुरवठा, इलेक्ट्रीक पॉइंटस याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान अधिकाऱ्यांसाठी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हातमोजे आदींचा समावेश असलेले किट देण्यात येणार आहे. मास्क, थर्मल गन, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझर, लिक्विड सोप यांचा पुरेसा पुरवठा झालेला आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहायक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी 18 हॉल तर शिक्षक मतदार संघासाठी 6 हॉल आहेत. त्यानुसार स्वतंत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, रो (रांग) अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक हॉलमध्ये 7 टेबल असतील. त्याप्रमाणे पदवीधरसाठी 126 पर्यवेक्षक, 252 सहायक व 126 शिपाई आणि शिक्षक मतदारसंघासाठी 42 पर्यवेक्षक 84 सहायक आणि 42 शिपायांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पदवीधरसाठी (राखीवसह) एकूण 855 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 305 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी 450 पोलीस अधिकारी-कर्मचारी उपलब्ध आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या पहाता मतमोजणीला 36 तासांहून अधिक कालावधी लागू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेवून प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे. मतदान आणि मतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे