पुणे दि २३ :- पुणे येरवडा कारागृहात पर्यटनाची महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. २६ जानेवारीला येरवडा कारागृहात ‘जेल-पर्यटन’ सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
पुण्यातील येरवडा कारागृहात २६ जानेवारीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कारागृहे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत.
या घटनांचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जतन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये ‘प्रिझन टुरिझम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. येरवडा, ठाणे, नाशिक कारागृहात स्वातंत्र्यलढ्यात अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. राष्ट्रीय पुढाऱ्यांनी या कारागृहांमध्ये शिक्षा भोगली आहे. त्या अनुषंगाने संबंधित कोठड्यांचे जतन करण्यात आले आहे. हा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्यासाठी काराग-ह पर्यटन उपयुक्त ठरु शकते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी ‘ दिली.
विद्यार्थ्यांच्या सहली, सर्वसामान्य नागरिकांना जेलयात्रेची परवानगी दिली जाणार असल्याचे रामानंद यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, तुरुंगांमध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक ठेवा आहे. तो नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी कारागृह प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून तो राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्याला मान्यता मिळताच ही योजना सर्वप्रथम पुणे, नाशिक रोड आणि ठाणे कारागृहात राबविण्यात येणार आहे.