श्रीगोंदा दि.०४ :-:-श्रीगोंदा शहरानजीक श्रीगोंदा जामखेड रोडवरील औटीवाडी या ठिकाणी बाळूमामाच्या मेंढ्या सध्या मुक्कामी आहेत. या मेंढ्यांना चालक आहेत, म्हणजे सांभाळणारे आहेत, परंतु मालक कोणीच नाही. कारण प्रज्ञावंत संत बाळू मामा वयाच्या ७४ व्या वर्षी सगुणरूप अदृश्य झाल्याचे भक्त सांगतात. मात्र,तत्पूर्वी बाळूमामांनी आपल्या सर्वशेळ्या,मेंढ्या,घोडे, इतर प्राणी व संपत्ती कोणाही नातेवाईकास,मित्राला,भक्तास वारस म्हणून दिली नाही,जमल्यास सांभाळ करा.समाजाला अन्न,पाणी व भक्तीचा लाभ करून द्या न जमल्यास सर्व डोंगरात सोडून आपला संसार सुखात करा अशी आज्ञा मामांनी भक्तांना दिल्याने आज या वाढत असलेल्या मेंढ्यांना चालक जरी दिसत असले तरी कोणीच मालक नाही,हे विशेष होय.3 ऑक्टोबर 1892 रोजी बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील ‘अक्कोळ’ या आडवळणी खेडेगावात परमेश्वराची चिमुकली पावले अवतरली अन् मायाप्पा-सत्यवा या उभयता पतीपत्नीचे अवघे आयुष्य समृद्ध करती झाली. सध्याच्या कागल-निपाणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ‘आप्पाची वाडी’ या खेडेगावातील ‘सत्यवा’ हिला बालपणापासून पंढरीच्या विठूरायाची ओढ होती. घरचे वातावरण आध्यात्मिक होते. सत्यवा नित्यनियमाने एकादशीचे व्रत करीत असे आणि विठ्ठल भजनात दंग राहत असे. पुढे सत्यवाचा विवाह मायाप्पासोबत झाला. धनगर कुटुंबात ‘सून’ म्हणून दाखल झालेली सत्यवा लवकरच सासरच्या रीतिभातीमध्ये रुळली आणि भैरू, बाळू आणि भीमाप्पा या तीन लेकरांना जन्मास घालून तिच्या संसाराला पूर्णत्वही देती झाली.
4 सप्टेंबर 1966 साली कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापुर गावात बाळूमामानी समाधी घेतली.बाळू मामा मधील ईश्वरी अंशाची जाणीव त्याला स्वतःला जरी पुरेपूर असली तरी इतर कुणाला असणे निव्वळ अशक्य होते. कधी कधी मनस्वी बाळू मामा अनाकलनीय वर्तन करीत असे.स्वतःवर आसुडाचे फटकारे मारणे,प्रसंगी मातीचा बोकाणा तोंडात सारणे तर कधी अल्लड,खेळकर,गमत्या स्वभावाने बघ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे यामुळे हे एकलकोंडे, मनस्वी पोर गावकऱ्यासाठी एकाच वेळी चेष्टेचा आणि कौतुकाचाही विषय होते. औटीवाडी येथे 11 दिवसांचा मुक्काम करून पुढे उद्या दि.5 रोजी सकाळी प्रस्थान करणार आहे.आजचा शेवटचा दिवस असल्या कारणाने गेलेले 10 दिवस भाविकांच्या स्मरणात राहतील.विशेष म्हणजे दररोज 15 ते 20 हजार भक्त समुदाय बाळूमामांच्या मेंढ्यांच्या दर्शनासाठी रोज संध्याकाळी हजेरी लावत होते.या भक्त गणासाठी दररोज सकाळी आरती नंतर दानशूर लोक नाष्टा व संध्याकाळी 8:30वा.प्रवचन नंतर 9वा.आरती 9:15वा.जेवणाच्या पंगती उठत असे. औटीवाडी परिसरातील तरुण मंडळे वाढपीचे योग्य नियोजन करत असायचे.
तसेच या मेंढ्या शेतकऱ्यांच्या रानात चरायला गेल्यानंतर काही उभे पीक असेल तर ते न खाता फक्त गवतच खायचे हा चमत्कार शेतकऱ्यांना पहायला मिळाला.आज औटीवाडी येथे मुक्कामाचा शेवटचा दिवस आहे.विशेष म्हणजे बाळू मामांची पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी आहे त्या ठिकाणी एक नैसर्गिक वारुळ आहे.त्याच्या खाली जेसीबीच्या साहाय्याने 10 फुटाचे भुयार करण्यात आले आहे.व संध्याकाळी होणाऱ्या आरती अगोदर मेंढ्या या भुयारातून प्रस्थान करत असायच्या.तसेच या भुयारातून जाण्याचा योग येणाऱ्या भाविकांना वर्षातून एकदा मिळतो.
बाळू मामाच मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे आहे.या मेंढ्यांचे कळप (पालखी) पूर्ण राज्यभरच नव्हे तर भारतभर फिरत आहेत. या पालख्यांची संख्या १७ आहे. एका पालखी सोबत दोन ते अडीच हजार मेंढ्यांची संख्या आहे.
परमेश्वर तत्त्व कधी, कुठे, कसे आणि कोणत्या स्वरूपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. घरच्या बकऱ्या, मेंढया जंगलात चरायला नेणारा धनगर कुटुंबातील लहानगा पोर अंगभूत कर्तृत्वाने आणि देवत्वाने पुढे मोठा होऊन जगाचा प्रतिपाळ करतो, केवळ एका हाकाऱ्याने बकऱ्याचा कळप मार्गी लावणारा हा अलौकिक मुलगा पुढे विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणून सोडतो हे म्हटलं तर अतार्किक आणि म्हटलं तर समजण्या-उमगण्याच्याही पलीकडचे आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे