श्रीगोंदा दि.१३ :- मराठ्यांच्या इतिहासात अटकेपार झेंडा लावलेले पराक्रमी सेनापती महादजी शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रीगोंदा येथील त्यांच्या स्मारकातील पादुकांची शासकीय पूजा करण्यात आली. तहसीलदार कार्यालयाचे वतीने नायब तहसीलदार डॉ.योगीताताई ढोले ,श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कार्यालय अधिक्षक प्रियंका शिंदे , दिलीपराव पोटे यांचे हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी शिक्षण संस्थांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे शाखा प्रमुख जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के ,महादजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक बापुसाहेब जाधव,किशोर जामदार, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी उपस्थित होते.या स्मारकातील महादजी शिंदे यांच्या पादुकांची विधीवत पूजा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
पूजनासाठी पानीपतच्या भूमीतून आणलेली मृदा जलामध्ये टाकून त्याचा जलाभिषेक करण्यात आला.या पूजनासाठी श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक अनुराधाताई नागवडे याही उपस्थित होत्या.
याप्रसंगी स्मारकाविषयी ऐतिहासिक माहिती प्रा.डॉ. नारायण गवळी व सचिन झगडे यांनी दिली.या स्मारकाचे संवर्धनासाठी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा आपापली जबाबदारी पार पाडतील अशी ग्वाही प्राचार्य डॉ.म्हस्के यांनी दिली.” जे नागरीक आपला इतिहास स्मरणात ठेवून वाटचाल करतात ते इतिहास घडवतात ” अशा प्रकारचे मनोगत या कार्यक्रमानिमित्त अनुराधाताई नागवडे यांनी व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या संचालक पदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व इतिहासप्रेमींच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी स्मारकाचे जतनाबाबत त्यास सुरक्षा कुंपन घालणे व स्मारक स्थळी सूचना फलक लावण्याचे पुरातत्व विभागाने पालिकेस आदेश दिलेले आहेत.याचे प्रा.गवळी यांनी अधिका-यांना स्मरण करुन दिले.पालिकेकडून या कामाची निश्चितपणे अंमलबजावणी होईल अशी ग्वाही पालिकेच्या कार्यालय अधिक्षक श्रीमती प्रियंका शिंदे यांनी दिली. या स्मारक स्थळी लाईटची अद्याप व्यवस्था नसल्याचे अँड.जयंत शिंदे यांनी लक्षात आणून दिले.नगराध्यक्षा पोटे ताई यांनी तातडीने नगरपरिषदेच्या वतीने या स्मारकस्थळी लाईटची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. तसेच या स्मारकाचे संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन हे स्मारक पालिकेकडून सुस्थितीत जतन केले जाईल असेही त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी शिंदे स्मारकाचे रक्षक रत्नाकर हराळ,रमणिकभाई पटेल,सुधाकर जाणराव,अँड रंगनाथ बिबे ,सुरेखाताई लकडे,रमेश गांधी,दत्तात्रय जगताप,गोरख नागवडे,सतीश शिंदे, विनायक ससाणे,दत्तात्रय शिंदे,अनिल बोरुडे,ईश्वर कणसे,संदिप माने,दिलीप धाडगे तसेच शिंदे परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी शिंदे घराण्याचे मूळ गाव कन्हेरखेडचे संभाजीराव शिंदे,सुहासराव शिंदे,दिलीराव शिंदे आदी मान्यवर खास करुन उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी स्मारकाचे पूजनाचे पौरोहित्य भर्तरी भागवत गरुजी यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय सस्ते यांनी केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे