पुणे दि २६ :- पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शुक्रवारी एक भला मोठा किंग कोब्रा आढळून आला. मुलांच्या वसतिगृहाजवळ हा नाग आढळून आला असून विद्यापीठातील सुरक्षारक्षक सुनील माळी यांना त्याला पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा वा जवळपास सहा ते सात फूट लांबीचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास विद्यापीठातील मुलांचे वसतिगृह क्रमांक 9 येथील केबिनमध्ये हा नाग आढळून आला. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना हा नाग दिसला. यानंतर त्यांनी ही बाब सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. सुरक्षा विभागातील सुनील माळी हे साप आणि नाग पकडण्यात तरबेज असल्याने त्यांनाही बोलावण्यात आले.
माळी यांनी 20 ते 25 मिनिटांमध्ये नागाला पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. किंग कोब्रा प्रजातीचा हा नाग होता. 6 ते 7 फुटांच्या नागाचे वजन तब्बल साडे चार किलो होते, अशी माहिती सुनील माळी यांनी दिली. माळी यांनी आतापर्यंत 200 हून अधिक नाग आणि साप पकडून त्यांना सुरक्षित अधिवासात मुक्त केले आहे
200 हून अधिक नाग, साप पकडले
दरम्यान, आज विद्यापीठात त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.