पुणे दि ०१ :- बंडगार्डन पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस कोठडीत बाहेरील नाष्टा खाण्यासाठी दिल्याचा धक्कादायक प्रकार बंडगार्डन पोलीस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या चार पोलिसांना प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.
सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर दिगंबर खत्री, पोलीस हवालदार सुभाष जगताप, सदाशिव शंकर गुजले आणि मारुती गेंगजे अशी शिक्षा दंडात्मक सुनावलेल्यांची नावे आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी गणेश कुऱ्हे याला अटक करण्यात आली होती.
त्याला 10 ऑक्टोबर 2020 रोजी अटक केल्यानंतर बंडगार्डन येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते
रात्री नऊ ते सकाळी नऊ यादरम्यान खत्री, जगपात, गुजले व गेंगजे हे पोलीस कोठडीच्या बंदोबस्तावर तैनात होते. दुसऱ्या दिवशी झोन दोनच्या उपायुक्तांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांनी पोलीस कोठडीतील रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी खुनातील आरोपी कुऱ्हे हे बाहेरील काही पदार्थ खात असल्याचे दिसून आले
न्यायालयाकडून आरोपीला खासगी नाष्टा देण्याचा कोणताही आदेश नव्हता. त्याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लेखी अथवा तोंडी असे कोणतेही आदेश नव्हते. तरीही आरोपी लॉकअपमध्ये खासगी ठिकाणाहून आणलेला नाष्टा खाताना दिसून आला. कोठडीमधील आरोपींच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याची चार पोलिसांचे कर्तव्य होते. मात्र, तसे न करता ड्युटीवर चार कर्मचाऱ्यांनी घटनेबाबत कोणतीही माहिती वरिष्ठांना दिली नाही.
हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे उघड झाला. त्यामुळे कर्तव्यामध्ये मोठी कसूर केली म्हणून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. दोन वर्षे वेतनवाढ का रोखू नये, अशी विचारणा केली होती. यावेळी चौघांनी उपायुक्तांकडे त्यांचे म्हणणे मांडले. त्यानंतर चौघांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली.आहे