पुणे दि 12 :- मुंबईचे मंगलप्रभात लोढा त्यांचा मुलगा आणि इतरांवर खंडणी आणि फसवणूक केल्याप्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडत तो न देता तसेच पैसे भरण्यास धमकावून फसवणूक केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा (रा. अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई) तसेच ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांच्याद्वारे सुरेंद्रन नायर यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 54 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सर्व प्रकार 2013 ते मार्च 2021 या कालावधीत घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वकिल आहेत. त्या पुण्यातील गोखले रोड परिसरात राहतात. त्यांना मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता. त्यानुसार त्यांनी मित्रांमध्ये चौकशी सुरू केली. यावेळी त्यांना त्यांच्या मित्रांच्या सर्कलमधून मंगलप्रभात लोढा यांच्या स्कीममध्ये फ्लॅट बुक करण्याचे सुचवण्यात आले.. त्यानुसार त्यांनी माहिती घेतली. यावेळी मंगलप्रभात हे ज्वाला रियल इस्टेट (नंतर नाव, मायक्रोटेक डेव्हलपर्स झाले) चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर होते. तर सध्या मंगलप्रभात यांचा मुलगा अभिषेक लोढा हे त्या कंपनीचे चेअरमन आहेत.
दरम्यान, फ्लॅट घ्यायचा असल्याने फिर्यादी यांच्याशी त्यांच्या कॉमन मित्रांमार्फत मंगलप्रभात यांनी संपर्क साधला. त्यांच्यात बोलणे झाल्यानंतर त्यांनी वरळी येथे सुरू असलेल्या स्कीममध्ये फ्लॅट बुक करण्यास सुचवले. त्यानंतर त्यांनी त्यांचा माणूस सुरेंद्रन नायर याला फिर्यादी यांच्या घरी पाठवले. त्यानुसार नायर घरी आला. त्याने फिर्यादी यांना सर्व माहिती दिली व इतर गोष्टी सांगितल्या. फ्लॅटचा व्यवहार हा 5 कोटी 52 लाख रुपयांना ठरला होता. त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्वाक्षरी करण्यास भाग पाडले होते. यानंतर बुकिंग म्हणून प्रथम फिर्यादी यांनी 9 लाख रुपयांचा चेक दिला. यानंतर वेळोवेळी फिर्यादी यांनी फ्लॅटचे एकूण 3 कोटी 92 लाख रुपये दिले. पण नंतर आरोपींनी वेळोवेळी या फ्लॅटची किंमत वाढवून सांगण्यास सुरुवात केली. तसेच ती वाढवून त्यांना पैसे मागण्यास सुरुवात केली. तर फिर्यादी यांनी फ्लॅट दाखवा असे सांगितले असता त्यांना काम व्यवस्थित सुरू असल्याचे सांगत टाळाटाळ करण्यात आली. यानंतर फिर्यादी यांनी त्यांना विश्वासाने दिलेल्या पैशाचा त्यांनी दुरूपयोग दुरुपयोग केला आहे. तसेच त्यांची फसवणूक केली. तर वाढीव रक्कम 4 कोटी 15 लाख 15 हजार रुपये भरा असे म्हणत त्यांना अन्यथा अग्रीमेंट टू सेल हा करार रद्द केला जाईल. तसेच भरलेली रक्कम फॉरफिचरनूसार जप्त होईल, अशी धमकी देऊन पैसे मागितले, असे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. तसेच त्यांना देण्यात येणारा फ्लॅट हडप करत फसवणूक करून खंडणी मागितली असल्याचा देखील उल्लेख तक्रारीत केला आहे. याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनील शेवाळे हे करत आहेत.