पुणे दि १२ :- गुढीपाडवा म्हणजे दृढ प्रवृत्ती आणि अरिष्टावर विजयाचा पताका रोवण्याचा क्षण…. यावर्षी आपण सगळेच कोरोना विरुद्ध अविरत लढाई लढत आहोत. या भयानक परिस्थितीत कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्यासाठी कोरोना योध्दे देखील लढत आहे. त्यांच्या या समर्पनाचा सन्मान करण्यासाठी यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी कारोनायोध्यांसाठी गुढी उभारून त्यांना पुणेकरांनी अनोखी मानवंदना द्यावी, असे आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे आपण गुढीपाडवा हा सण खूप साध्या पध्दतीने साजरा केला होता. यावर्षी देखील कोरोनामुळे आपल्याला 13 एप्रिलला गुढीपाडवा घरात बसून साध्या पद्धतीने साजरा करावा लागेल.
यासाठी यंदा पुणेकरांनी गुढी उभारताना कुटुंबातील मुलांना कोरोना योद्धाची वेषभूषा परिधान करायला सांगावी तसेच गुढीवर कोरोना संदर्भात एक आकर्षक संदेश लावावा. कोरोनाग्रस्तांशी लढणारे डॉक्टर, नर्सेस , सफाई कर्मचारी, पोलीस यांसारख्या वेशभूषा परिधान करून त्यांना मानवंदना द्याव्या असे देखील निम्हण यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर कोरोना योध्यांच्या हातून गुढी उभारण्यात यावी. तसेच हे फोटो सोशल मिडीयावर पाठवावेत अथवा आमच्याकडे पाठवावेत ते सोशल मिडीयावर प्रसिध्द केले जातील, असे आवाहन निम्हण यांनी केले आहे.
या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन कोरोनाशी पहिल्या आघाडीवर दोन हात करणाऱ्या योध्दांचा सन्मान करावा असेही ते म्हणाले व पुणेकर नागरिकांना नम्र आवाहन आहे की या उपक्रमात सहभागी होऊन आपण सर्वांनी कोरोना योद्धाना एक आगळी वेगळी मानवंदना द्यावी. अशा कृतीतून कोरोना विषयक जागरुकता वाढेल व कोरोना योद्धांबद्दल कृतज्ञता व्यक्त होईल, असा उद्देश यामागे असल्याचे सनी निम्हण यांनी सांगितले आहे.