कर्जत दि ३०:-सोशल मीडियातील फेक अकाउंटवरून गुन्हेगार डाव साधत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे. प्रोफाइलमध्ये सुंदर छायाचित्र असलेल्या तरुणीने तुम्हाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली किंवा फॉलो केले तर बळी पडू नका. हीच तरुणी आपल्याला केव्हा बळीचा बकरा बनवेल याचा नेम नाही. निर्वस्त्र असलेले चित्रीकरण करून ही टोळी नागरिकांडून खंडणी उकळत आहे. या टोळीने कर्जत तालुक्यातील अधिक नेटकऱ्यांकडून खंडणी उकळली आहे. पोलिसांकडे याबाबतच्या नोंदी आहेत.अनेकांना अजूनही खंडणीची मागणी केली जात आहे. मात्र, कुणी इभ्रतीपोटी तक्रारीसाठी पुढे येतातच, असेही नाही. त्यामुळे ‘सावध व्हा. बुलाती है, मगर जाने का नही, असा ठाम निश्चय करा. अन्यथा पैसा तर जाईलच, सोबत सामाजिक पतही गमावून बसाल, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.रिया किंवा अन्य आकर्षक नावाने ही टोळी सावजाला हेरते. त्यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविते. सोशल मीडियावर फॉलो करते. सुरुवातीला चॅट करून ती नेटकऱ्याचा मोबाइल क्रमांक घेते. या टोळीचा रात्रीस खेळ चालतो. समोरच्याचा विश्वास संपादन केला जातो. त्याला रिझविले जाते. रात्री व्हिडीओ कॉल करून या तरुणी अश्लील चॅट करतात. समोरची व्यक्ती घट्ट जाळ्यात अडकल्याची खात्री पटताच ती तुम्हाला ऑनलाइन निर्वस्त्र करते. त्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देते अन् लाखो रुपयांची खंडणी उकळली जाते.गेल्या काही दिवसापासून कर्जत तालुक्यात अशाप्रकारे खंडणी उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या या अश्लील व्हिडीओ कॉल स्कॅमचे अनेक युवक बळी पडताना दिसत आहेत.कर्जत तालुक्यातील युवकांना पैसे द्या नाहीतर व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या आल्या. युवकांनी पैसे देऊनही त्यांना पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.साहेब तक्रार घ्या, गुन्हा दाखल करू नका परंतु यावर मार्ग काढा अशी आर्जव तरुण करत आहेत.सायबर सेलचे अनेक गुन्हे आता डोके वर काढत असुन प्रत्येकाने सावधगिरी बाळगून सोशल मिडियाचा वापर करावा असे आवाहनही पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.
अधिक लोकांना या टोळीने जाळ्यात अडकविले आहे. हा आकडा अधिकही असू शकतो. बदनामीच्या भीतीने अनेकांनी तक्रार दाखल केली आहे. निर्वस्त्र असलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन ही टोळी खंडणी उकळते. सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अनोळखी तरुणींची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये. फसवणूक झालेल्या नागरिकांनी सायबर सेलकडे तक्रार करावी. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल,असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे