कर्जत दि ३०: – दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरची वाहतूक करणारी एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली व कारमधून असिफ गफूर शेख, वय २२ वर्ष,अरबाज हसन शेख, वय २२ वर्ष, दोघे रा.मुसलमान वस्ती, दूरगाव, ता. कर्जत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खेड गावचे दिशेने एक स्विफ्ट कार येत असून त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे आणि ती पावडर घरी जाऊन दुधात पाणी, पावडर व इतर साहित्य टाकून दुधात भेसळ करणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलीस हवालदार महादेव गाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गणेश भागडे ,महिला होमगार्ड कल्पना घोडके यांना सांगून सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करा असे आदेशीत केल्याने वरील पोलीस स्टाफ तात्काळ पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहनाने रवाना झाले.सविस्तर वृत्त असे कि, खेड गावचे शिवारात एक स्विफ्ट कार क्रमांक एम.एच.१४ बी. के.२७७२ असलेली आली असताना त्यास पोलिसांनी थांबवून पोलीस स्टाफने सदर वाहनाची झाडा झडती घेतली असता गाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या २५ किलो वजनाच्या ८ गोण्या व प्रत्येक गोणीची किंमत ३५०० रु. प्रमाणे २८ हजार रुपयांची दूध पावडर आणि गाडी असा एकूण ४ लाख २८हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला असून, त्यावेळी पोलिसांनी वरील इसमांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही ही पावडर दुधात भेसळ करण्यासाठी आमचे दूरगाव गावी चाललो होतो. त्यावेळी पोलिसांची खात्री झाली की सदरची पावडर ही दुधात भेसळ करण्यासाठी घेऊन जात होते असे कळवून त्यांचे घरी जाऊन भेसळ केली जाते.याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. असिफ गफूर शेख, व अरबाज हसन शेख यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन अदखलपात्र गुन्हा रजिस्टर न ६९४/२०२१ भा.द.वि कलम २७२,२७३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून कोर्टाचे परवानगीने पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, सहायक फौजदार महादेव गाडे, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सुनील खैरे यांनी ,महिला होमगार्ड कल्पना घोडके यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे