पिंपरी चिंचवड दि ०७ :- पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथील जाधववाडी- कुदळवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांची उच्छाद मांडला असून, त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका पशु वैद्यकीय विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
या संदर्भात दिनेश यादव यांनी महापालिका पशु वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. अरुण दगडे यांची गुरुवारी भेट घेतली. तसेच जाधववाडी- कुदळवाडी परिसरातील मोकाट बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
दिनेश यादव म्हणाले की, परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले आणि महिला वर्गांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा दुचाकीस्वार कुत्रे अंगावर आल्यामुळे दुचाकी घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत.रात्री-अपरात्री कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या कामगार वर्गालाही भटक्या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे.याबाबत परिसरातील काही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. यापूर्वीही प्रशासनाला याबाबत आम्ही मागणी केली होती. आता पुढील काळात पुश वैद्यकीय विभागाने मोकाट कुत्र्यांबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.दरम्यान, ज्या भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आहे. त्या भागातील तक्रारदार नागरिकांनी संपर्क क्रमांक प्रशासनाला कळवावे. त्याठिकाणी प्रशासन निश्चितपणाने कुत्रांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी पुढाकार घेईल, असे आश्वासन पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिले आहे.