पुणे दि. १९ :- पुणे परिसरातील जिजामाता चौक येथे रस्त्याने जात असलेल्या एका कारला अडवून कार मधून जाणाऱ्या दोघा भावांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी दि. 17 तारखेला रात्री साडेदहा वाजता जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली.निखिल अरुण कोडीतकर (वय 22, रा. डाळ आळी, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय भंडलकर वय 23 किरण ढेबे वय 27 नितीन फाटक वय 26 सर्व रा. तळेगाव दाभाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मोठा भाऊ अजय हे दोघेजण कार मधून जात होते.माळसकरवाडी येथील पेट्रोल पंपावरून डिझेल भरून जात असताना तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात आरोपी नितीन याने रस्त्यात थांबून फिर्यादी यांची कार अडवली. त्यामुळे फिर्यादी कार मधून खाली उतरून आरोपी नितीन याला बाजूला होण्याबाबत समजावत होते. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला.जवळच एका दुचाकीवर बसलेले आरोपी अजय आणि किरण या दोघांनी तिथे येऊन धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या हातावर वार केले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचा भाऊ घाबरून पळून जात असताना आरोपी नितीन याने कोयत्याने मारून फिर्यादी यांच्या भावाला जखमी केले. तळेगाव दाभाडे येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.