पिंपरी चिंचवड दि २४ :- भोसरी परिसरातील पुणे-नाशिक रोडवरील शिवगंगा कॉम्प्लेक्समध्ये असलेले सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम अज्ञातांनी बनावट चावीच्या साहाय्याने उघडून रक्कम चोरून नेली. होती हि घटना शनिवारी (दि. 24) मध्यरात्री दीड वाजता घडली. यातील आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही तासात अटक केली आहे. या प्रकरणात बँकेचा कॅशियरच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कॅशियर, बँकेचा शिपाई आणि अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.कॅशियर रोहित काटे, रोहित महादेव गुंजाळ (रा. पिंपरी), आनंद चंद्रकांत मोरे (रा. पिंपरी), सचिन शिवाजी सुर्वे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील पुणे-नाशिक रोडवर शिवगंगा कॉम्प्लेक्स मध्ये सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम आहे. शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी अनधिकृतपणे एटीएम उघडून त्यातून 4 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही चोरी करत असताना गोपीनाथ पिंडारे या व्यक्तीने आरोपींना हटकले. त्यावेळी आरोपींनी त्यांना लोखंडी हातोडा उगारून मारण्याची भीती घातली आणि चोरटे पळून गेले.बँकेने एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नेमणे, सीसीटीव्ही लावणे, अलार्म लावणे अशा सुरक्षेबाबत उपाययोजना करणे आवश्यक असताना बँकेने रिझर्व्ह बँकेचे नियम न पाळल्याबाबत बँकेचे संबंधित अधिकारी आणि अज्ञात दोन चोरट्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सुरुवातीला एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एटीएम सेंटरच्या आतील सीसीटीव्ही आणि एटीएमची स्क्रीन चोरट्यांनी फोडली होती. मात्र सेंटरच्या बाहेरील कॅमेऱ्यात एक चोरटा कैद झाला होता. एटीएम फोडण्याच्या पद्धतीवरून यात बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यात बँकेचा शिपाई रोहित गुंजाळ या कर्मचाऱ्यावर पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी रोहित गुंजाळ याच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने आनंद मोरे आणि रोहित रोकडे अशी मोघम नावे सांगितली. रोहित रोकडे हे त्याने बनावट नाव सांगितले होते. तर आनंद मोरे हा या प्रकरणातील एक आरोपी होता. तोच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याच्या पायात असलेली चप्पल घातलेला एक फोटो पोलिसांना गुंजाळ याच्या फोनमध्ये पोलिसांना मिळाला.पोलिसांचा संशय आणखी बळावला. लागलीच पोलिसांनी आनंद मोरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आनंद मोरे याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्या वाट्याला आलेले दोन लाख 70 हजार रुपये काढून दिले.बँकेचा शिपाई रोहित गुंजाळ आणि कॅशियर रोहित काटे यांनी अर्धी रक्कम घेण्याच्या अटीवर एटीएम मशीनचा पासवर्ड आणि एटीएम मशीनची बनावट चावी दुसऱ्या दोन आरोपींना दिली.रोहित काटे याने मागील एक वर्षापासून 10 लाख 80 हजार एवढी कॅश एटीएम मध्ये न भरता त्या रकमेची अफरातफर केली होती. त्यानंतर ती रक्कम त्याने 22 जुलै 2021 रोजी बँकेत चलनाद्वारे जमा केल्याचे काटे याने कागदी घोडे नाचवले होते.तडीपार आरोपी सचिन सुर्वे आणि आनंद मोरे या दोघांनी एटीएम फोडले होते. घटना उघडकीस आल्यानंतर आपले प्रताप लपवण्यासाठी कॅशियर रोहित काटे याने एटीएम मधून 15 लाख 42 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले. तसा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र एटीएम मधून 4 लाख 40 हजार एवढीच रक्कम चोरीला गेली होती.भोसरी पोलिसांनी कॅशियर रोहित काटे, शिपाई रोहित गुंजाळ, आनंद मोरे या तिघांना अटक केली. तर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी तडीपार आरोपी सचिन सुर्वे याला अटक केली. त्याच्याकडून 87 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक करत रोख रक्कम, दुचाकी असा एकूण 3 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कामगिरी. कृष्ण प्रकाश. पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , रामनाथ पोकळे. अप्पर पोलीस आयुक्त , मंचक इपर , पोलीस उपायुक्त परि . १ . डॉ . सागर कपडे सो . सहाय्यक पोलीस आयुक्त , पिंपरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक . शंकर आवताडे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) जितेंद्र कदम , पोलीस उप निरीक्षक रविद्र भवारी , पोलीस उप निरीक्षक गोविंद पवार , पो . हवा . बोयणे , पो . हवा . विनायक म्हसकर , पो . ना . गणेश हिंगे , पो . ना . बाळासाहेब विधाते . पो . शि . आशिष गोपी , पो . शि . सागर भोसले , पो . शि . सुमित देवकर , पो . शि . समीर रासकर , पो . शि . गणेश सावंत . पो . शि . वीर यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे .