पुणे आयकर विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल मच्छिन्द्र भोसले यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या’ या मराठी चित्रपटाचे अकरा देशांत कौतुक झाले आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ५४ पुरस्कार पटकावले आहेत. निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना आत्मविश्वास देणाऱ्या या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.सकारात्मकतेचं बीज पेरणारा ‘फिरस्त्या’ चित्रपट हा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत यशापर्यंत पोहोचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादायी गोष्ट आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या‘ ने भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया या ११ देशांमधील २५ आंततराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण ५४ पुरस्कार जिंकलेले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट- १८ पुरस्कार, विठ्ठल मच्छिन्द्र भोसले यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- १७ पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पटकथा – ६ पुरस्कार, समीर परांजपे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता- ६ पुरस्कार, समर्थ जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता- १ पुरस्कार, गिरीष जांभळीकर यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ३ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण- २ पुरस्कार आणि श्री प्रमोद कहार यांना सर्वोत्कृष्ट संकलन १ असे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच ‘फिरस्त्या‘ ची फायनॅलिस्ट म्हणून अमेरिका, रशिया, फ्रान्स , स्वीडन आणि तुर्की या ५ देशांमधील ५ चित्रपट महोत्सवांत निवड झाली आहे. या
व्यतिरिक्त “फिरस्त्या” चे भारत, अमेरिका, युनाइटेड किंग्डम, अर्जेन्टिना, स्पेन, स्वीडन, व्हेनेझुएला, लिथुआनिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो या ९ देशांतील एकूण ११ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ऑफिसिअल सिलेक्शन झालेलं आहे .”फिरस्त्या” चित्रपट १९ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, २०२१ मध्ये मराठी चित्रपट स्पर्धा विभागात पहिल्या सात चित्रपटांमध्ये असून त्याचा अंतिम निकाल येणे बाकी आहे.चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांनी चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेट वर उपलब्ध माहिती आणि यु ट्यूब वरील व्हिडिओ पाहून हा चित्रपट बनवला आहे. भोसले यांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी नंबर ३ हे आहे. निर्माती डॉ.स्वप्ना विठ्ठल भोसले यांनी त्यांच्या ‘झुंजार मोशन पिक्चर्स’ या संस्थेद्वारे ‘फिरस्त्या‘ची निर्मिती केलेली आहे. या चित्रपटात ‘ सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत “अभ्या”(अभिमन्यू जहागीरदार) ची भूमिका केलेले समीर परांजपे, हरिष बारस्कर, ‘तेरी लाडली मैं’ या मालिकेत प्रमुख भूमिका केलेली मयूरी कापडणे, देवमाणूस’ या मालिके मधील अंजली जोगळेकर, बाल कलाकार – श्रावणी अभंग, समर्थ जाधव, आज्ञेश मुडशिंगकर यांनी भूमिका केल्या आहेत.‘फिरस्त्या‘ साठी पार्श्व गायन आदर्श शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत दिग्दर्शन रोहित नागभिडे, देवदत्त मनिषा बाजी, पार्श्व संगीत रोहित नागभिडे, गीतकार गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख, छायाचित्रण गिरीश जांभळीकर, ध्वनी संयोजन राजेंद्र त्यागी, साऊंड डिझाइनर: पियुष शहा, संकलन: प्रमोद कहार, डी आय कलरिस्ट : विनोद रविंद्र राजे, व्ही एफ एक्स : सारंग गंगापूरकर आणि विनोद साठे यांनी केलेले आहे.. संघर्षातून यशोशिखराकडे जाणाऱ्या नायकाची गोष्ट असलेला ‘फिरस्त्या’ पाहण्यासाठी आता मराठी रसिक श्रोतेही उत्सुक आहेत.