पुणे ग्रामीण दि:-२ :- मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत गेल्यामुळे आज पहाटे पानशेत धरणातील वीजनिर्मिती साठी सोडलेला ६०० क्यूसेकचा विसर्ग सकाळी बंद केला तर खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा ८५६ क्यूसेक विसर्ग रविवारी रात्री आठ वाजता पूर्णपणे बंद करण्यात आला. चार धरणात मिळून ९२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरण २२ जुलै रोजी १०० टक्के भरल्यानंतर या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. मागील अकरा दिवसांत खडकवासला धरणातून सुमारे चार टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. या नदीत सोडलेले चार टीएमसी पाणी शहर आणि परिसराला साडेतीन महिने पाणी पुरले असते तर शेतीचे एक आवर्तन झाले असते.मुठा नदीत सोडलेले पाणी पुढे उजनी धरणात जाऊन मिळते.पानशेत धरण २९ जुलै रोजी रात्री ९३ टक्के भरले होते आणि पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिला होता त्यामुळे त्याच दिवशी या धरणातून ६०० क्युसेक्स विसर्ग वीजनिर्मिती सोडला होता. आज सकाळी हा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.सोमवारी सकाळी सहा वाजता चार ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :
धरणाचे नाव- एकूण क्षमता (टीएमसी) / उपयुक्त साठा (टीएमसी) / टक्केवारी
खडकवासला- १.९७ १.९० ९६.१७
पानशेत- १०.६५ १०.५४ ९८.१७
वरसगाव- १२.८२ ११.३५ ८८.५५
टेमघर- ३.७१ २.९० ७८.३८
चार धरणात एकूण पाणीसाठा – २९.१५ २६.७० ९१.५८