राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुमधुर गळ्याची गायिका ‘सावनी रविंद्र’ने अत्यंत गोड बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे सोबत एक सुंदर व्हिडिओ शेअर करत त्यांना गोंडस मुलगी झाल्याची गुडन्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तिच्या घरी चिमुकली पाहुणी आली आहे. ही बातमी कळताच सिनेसृष्टीतील कलाकारांनी आणि सावनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
गायिका सावनी रविंद्र या गोड बातमी विषयी भावना व्यक्त करताना सांगते, “सहा ऑगस्टला शुक्रवारी लक्ष्मीच्या रूपाने माझ्या पोटी मुलगी जन्माला आली. आणि ही मुलगी माझ्यासाठी लकी चार्म आहे. तिच्या जन्माच्या आधीपासूनच गेल्या नऊ महिन्यात तिने मला भरभरुन प्रेम दिलंय. आणि आता या पृथ्वीतलावर जन्माला आल्यानंतर इथून पुढचा प्रवास खूप सुंदर असणार आहे याची मला खात्री आहे. मला मुलगी झाली याचा मला विशेष आनंद आहे. कारण आत्ताच्या काळात सामर्थ्यवान आणि महत्वाकांक्षी अश्या मुली घडणं आणि त्याचबरोबर तश्या घडवणं ही मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं.”
पुढे ती सांगते, “आजपर्यंत गायिका म्हणून आईपणावर मी विविध गाणी गायलेली आहेत. त्याबद्दल मी बरंच काही वाचलेलं आहे. ऐकलेलं आहे. आता तो प्रवास प्रत्यक्षात अनुभवताना खूप अलौकीक भावना आहे. आणि याचं वर्णन मी शब्दात नाही सांगू शकत. माझ्यासाठी हे सर्व अविस्मरणीय आहे. मला माहित आहे की हा प्रवास सोपा नाही आहे. आई होणं हे सोपं नाहीयं. खूप अवघड जबाबदारी आहे. कारण मातृत्व ही स्त्रीला देवाने दिलेली देणगी आहे. आणि माझ्या पोटी एक स्त्रीशक्ती जन्माला आली आहे. त्यामुळे तिला मी खूप मनापासून घडवीन. इथून पुढचा प्रवास खूप आनंददायी असेल याची मला खात्री आहे.”