पुणे, दि.०८ :- आयुर्वेदिक कंपनीच्या नावाने देशभरात सध्या मागणी चांगली आहे.व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी टक्कर देत त्यांची बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. त्याकडे आता सायबर चोरट्यांचे लक्ष गेले आहे. आयुर्वेदिक कंपनीचे स्टोअर उघडून देतो, असे सांगून सायबर चोरट्याने एकाला ५ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी एका ४६ वर्षाच्या नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ ऑक्टोंबर ते ११ नोव्हेंबर २०२० दरम्यान घडला. फिर्यादी यांना एक फोन आला होता. फिर्यादी व त्यांच्या भावाला आयुर्वेदिक कंपनीचे स्टोअर एजन्सी चालू करुन देतो, असे सांगून त्यांना त्यासाठी वेळोवेळी बँक खात्यावर ५ लाख ७० हजार रुपये भरायला सांगितले.त्यानुसार त्यांनी शिवशंकर यादव, सुजीत कुमार यांच्या बँक खात्यावर पैसे भरले. त्यानंतरही त्यांना कोणत्याही प्रकारची एजन्सी मिळवून दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन चतु:श्रृंगी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा.विजयकुमार लांबतुरे करीत आहेत.