पुणे,दि.२५ :- पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड येथील २९ औषध दुकानांचे परवाने वर्षभरात रद्द करण्यात आले आहेत, तर १४६ दुकानांचा परवाना निलंबनाची कारवाई झाली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) देण्यात आली.औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यातील वेगवेगळ्या नियमांचा भंग केल्याने ही करवाई झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील औषध दुकानांविरोधात ही कारवाई करण्यात आली.या भागातील दोन हजार ४३० दुकानांची नियमित तपासणी करण्यात आली. त्यात घाऊक आणि किरकोळ औषध विक्री दुकानांचा समावेश होता, अशी माहिती ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली. दुकानामध्ये फार्मासिस्टच्या अनुपस्थिती औषध विक्री करणे, अनधिकृत औषध विक्री, औषधांच्या खरेदी-विक्रीची बिले नसणे किंवा बिलाशिवाय औषध विक्री हे नियमभंग करणाऱ्या औषध दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेड्यूल ‘एच’ आणि ‘एच-१’ मधील औषधांची विक्री फक्त नोंदणीकृत डॉक्टरांनी दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीवरच करणे बंधनकारक आहे. परवाना निलंबित केलेल्या विक्रेत्यांनी या नियमांचा भंग केला होता. ५ ते ९० दिवसांपर्यंत दुकानाचा परवाना निलंबित करण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.