पिंपरी-चिंचवड,दि.२५ :- पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या यापुर्वी एकदा लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी पुणे शहरातील मुंढवा येथील हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालक आणि मॅनेजर सोबत हुज्जत घालून पैशांची मागणी केली.रुग्णनिवेदन रजेवर असताना शासकीय गणवेश घालून उपनिरीक्षकाने हा प्रकार केला असल्याने त्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.मीलन कुरकुटे असे निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक मीलन कुरकुटे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात नेमणुकीस आहेत. 21 ऑगस्ट 2021 पासून ते रुग्णनिवेदन रजेवर होते. दरम्यान 24 ऑगस्ट रोजी रजेवर असताना कुरकुटे शासकीय गणवेश घालून पुणे शहरातील मुंढवा येथील हॉटेल कार्निव्हल येथे गेले.त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालक आणि मॅनेजर सोबत हुज्जत घालून पैशांची मागणी केली. याबाबत हॉटेल मालकाने मुंढवा पोलिसांना माहिती दिली. मुंढवा पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयास या घटनेची माहिती दिली.पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशोभनीय कृत्याबद्दल त्यांचे त्वरित प्रभावाने निलंबन करण्यात आले आहे. उपनिरीक्षक कुरकुटे यांच्यावर भारतीय संविधान अनुच्छेद 311, 2 (ब) अन्वये सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचेही उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले