पुणे ग्रामीण,दि.०३ :-पुणे परिसरातील कुख्यात गुन्हेगार नीलेश बन्सीलाल घायवळ याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्याच्या विरोधात करण्यात आलेली अटकेची कारवाई रद्द केली आहे.घायवळ हा तडीपार असताना त्याने भिगवण परिसरात गुन्हा केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस ॲक्टिव्हिटी (एमपीडीए) नुसार ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली होती. त्याला स्थानबद्ध करून त्याची येरवडा कारागृहात एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली. याबाबचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. जे. जमादार आणि एस. एस. शिंदे यांनी दिले आहेत.अटक रद्द करण्यासाठी त्याने अॅड. सत्यव्रत जोशी आणि अॅड. सुमंत देशपांडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अपहरण, असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कोथरूड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. या गुन्ह्यात 2020 मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर ही त्याने भिगवण परिसरात खंडणी व अपहरण केल्याचा गुन्हा केला. त्यामुळे त्याच्या विरोधात एमपीडीएच्या कारवाईचा प्रस्ताव पुणे ग्रामीण अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी घायवळ याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यास परवानगी दिली. त्यानुसार घायवळ याला जामखेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले.पुणे ग्रामीण मध्ये गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे.गेल्या वर्षात अनेक टोळ्यातील गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.