पुणे दि.१३ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी खेलो इंडिया उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून या माध्यमातून तरूण खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळत आहे. या माध्यमातून देशभरातून पुढे येणारे खेळाडू आपल्या देशासाठी भरपूर ऑलिम्पिक पदके मिळवतील, असा विश्वास व्यक्त करत नवयुवकांसाठी खेलो इंडियाचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेला व खेलोत्सवाला जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आपला मुलगा अजिंक्य सोबत भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, खेलो इंडियाच्या निमित्ताने आपल्याकडे हो मोठा क्रीडा महोत्सव होत आहे. या क्रीडा महोत्सवातून अनेक खेळाडूंना चालना मिळेल, भावी खेळाडू घडतील आणि क्रीडा संस्कृती बळकट होण्यास मदत होणार आहे. खेलो इंडियाची ही दुसरी स्पर्धा असून त्याच्या आयोजनाचा मान आपल्याला मिळाला आहे. या स्पर्धेचे आयोजन अत्यंत नेटक्या पध्दतीने केले आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा मिळणार आहे. विविध राज्यातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी मोठा मंच उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आपल्या देशाला यापुढे मोठ्या प्रमाणात ऑलिम्पिक पदके निश्चितच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी मुलाला आणले, तुम्ही ही आणा…
नवी क्रीडा संस्कृती रूजविण्यासाठी युवकांना या मध्ये सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेलोत्सवात खेळण्यासाठी मी माझ्या मुलाला घेऊन आलो आहे, प्रत्येक पालकांनीही आपल्या पाल्यांना खेलो इंडिया स्पर्धा पाहण्यासाठी घेऊन येण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा अजिंक्य सोबत कबड्डी, धुनर्विद्या, डार्ट, ओपन जीमसह विविध खेळांचा आनंद घेतला.
“लोकराज्य”च्या स्टॉलला भेट…
खेलोत्सवाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या लोकराज्यच्या स्टॉललाही प्रा. शिंदे यांनी भेट दिली. लोकराज्यचा जानेवारीचा अंक खेलो इंडिया विशेषांक म्हणून प्रसिध्द केला आहे. या संपूर्ण अंकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली.