पुणे, दि: १३:- रविवारी सकाळी सीओएपी च्या झेस्ट ह्या क्रीडा महोत्सवा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘सायक्लोथॉन’ची पहिली आवृत्ती दिमाखात पार पडली. हा उपक्रम ‘इंडो सायकलिस्ट क्लब’ ह्यांच्या सहयोगाने आणि ‘पुणे महानगर पालिका’ व ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
ह्या उपक्रमात अगदी १० वर्षांच्या चिमुरड्यांपासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचा सहभाग दिसून आला. सकाळी ६ वाजता अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सहभागी स्पर्धकांनी सायकलिंगला सुरुवात करत सीओएपी मैदान, शिवाजीनगर पासून पाषाण व तिथून परत शिवाजीनगर अश्या पद्धतीने १५ किलोमीटर लांबीचा पल्ला पार केला. आयोजकांशी संवाद साधला असता ह्या सायक्लोथॉनचा उद्देश “समाजामध्ये सायकलस्वारांच्या सुरक्षिततेबद्दल जागृती निर्माण करणे व सक्षम, निरोगी आणि प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी वाहतूकीचे मुख्य साधन म्हणून सायकल वापरण्याचा पायंडा पाडणे” असा आहे हे समजले.
ह्या पूर्ण उपक्रमात सीओएपीच्या ‘झेस्ट-१९’ अंतर्गत काम करणाऱ्या २००हून अधिक स्वयंसेवक, समन्वयक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुखांचा अत्यंत उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण सहभाग होता.