पुणे,दि.०२ :-आपल्या भारदस्त आवाजाने अनेक ऐतिहासिक भूमिका गाजवत रसिकमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा एका अभिजात कलाकृतीच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. ही भेट आवाजरूपी असणार आहे. ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने प्रेक्षकांसाठी बाहुबलीचा खास मराठमोळा साज आणला आहे. या मराठमोळया बाहुबलीला अभिनेते अमोल कोल्हे यांचा आवाज असणार आहे. या अनोख्या प्रकल्पाबद्दल आणि मराठमोळया बाहुबलीच्या नव्या रुपाबाबत डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी साधलेला संवाद.
या प्रकल्पाशी तुम्ही कसे जोडले गेलात?
मला दिग्दर्शक प्रवीण तरडें कडून ‘बाहुबली’ या व्यक्तीरेखेला आवाज द्यायचा आहे. तो दयाल का? याबाबतची विचारणा झाली. ‘बाहुबली’ सारखी भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दग़ड ठरलेली कलाकृती मराठीत ‘डब’ होतेय ही गोष्ट मला भारावून टाकणारी होती. त्यातही ‘बाहुबली’ या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेला आवाज दयायचा या भावनेने मी आनंदीत झालो. अभिनेते– दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अतिशय मेहनतीने ही जबाबदारी सांभाळली. वेळ कशी जुळवायची? हा प्रश्न होता पण ‘इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीने ऐतिहासिक भूमिकेचा बाज सांभाळणे अंगवळणी असल्याने काम सहज शक्य झालं.
लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या बाहुबली या व्यक्तिरेखेला आवाज देताना काय भावना होत्या.?
माझा स्वत:चा हा खूप आवडीचा चित्रपट आहे आणि ‘बाहुबली’ सारखी व्यक्तिरेखेला साकारायला मिळणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. या भूमिकेला आवाज द्यायला मिळणं हे आनंददायी व आव्हानात्मक होतं. तीन वेगवेगळ्या पातळयांवर आवाज द्यायचा होता. सुरुवातीचा तरुण बाहुबली, अमरेंद्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबली अशा तीन वेगवेगळ्या व्यक्तीरेखांच्या आवाजाचा बाज सांभाळत वैविध्य देणं हे तितकंच कठीण होतं.
‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीच्या या संकल्पनेबद्दल काय सांगाल?
दिग्दर्शकाच्या नजरेतून काय निर्माण होऊ शकतं हे दाखवून देणारा बाहुबली मराठीत आणत त्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांनी केवळ ‘डब’ प्रोजेक्ट नाही तर एक नवीन प्रोजेक्ट अशा रितीने या चित्रपटाकडे बघितलं. यातील भव्यतेसोबत यातील संगीत,गीतलेखन या सगळयातून मराठी भाषेचं सामर्थ्य प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मराठी अवतारातल्या बाहुबलीतून पुन्हा एकदा आपल्या मातृभाषेची, मराठीची महत्ता अधोरेखित होईल हे नक्की.
बाहुबली चित्रपटातील तुमची आवडती व्यक्तिरेखा कोणती?
या चित्रपटातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा माझ्या आवडीच्या आहेत त्यातही ‘बाहुबली’ आणि ‘शिवगामी’ या व्यक्तिरेखा माझ्या अधिक आवडीच्या आहेत.