मुंबई, दि.०६ :- राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, एसटी कामगारांच्या गंभीर समस्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून दररोज समीर वानखेडे यांना टार्गेट करण्यात येत आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.
एखाद्या अधिकाऱ्याची आई, पत्नी किंवा वडील यांच्यावर सतत टीका करणे समजण्या पलिकडचे आहे. आपली सर्व संबंधितांना विनंती आहे की, हा प्रकार थांबवा आणि तपासी यंत्रणांना त्यांचे काम करू द्या, असे आवाहन त्यांनी केले.
गुन्ह्यात तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला धारेवर धरले की मूळ अंमली पदार्थांचा आणि गुन्ह्यावरील कारवाईचा विषय बाजूला राहतो, असे ते म्हणाले.
नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहेत व त्यांना अधिकार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात काही असेल तर चौकशी करून शिक्षा करा. पण एखाद्या अधिकाऱ्याला सतत इतके धारेवर धरावे का, असा सवाल मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
ते म्हणाले की, केवळ नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली म्हणून वानखेडे यांना धारेवर धरले, असे प्रकरण दिसत नाही. याचे धागेदोरे अनेक वर्षापूर्वीचे असावेत आणि जुने हिशेब चुकते करणे चालू असावे, असा अंदाज आहे.
नगरच्या घटनेविषयी शोक
नगर येथे रुग्णालयाला आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला. या दुर्घटनेतील जखमींना व मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.